Logo Omkar Mission Dombivali

February, 2016

now browsing by month

 

महायोग विज्ञान

Blog placeholder

महायोग हे विज्ञान आहे. महायोग हे विज्ञान आहे हे सत्य मान्य केल्यावर विज्ञानामध्ये असलेली प्रत्यक्ष कृती (Practical) व शाब्दिक ज्ञान (Theoretical) हे भाग महायोगा मध्ये सुद्धा अंतर्भूत करावे लागतात. महायोग विज्ञाना मधील ‘तत्वमसी’ हे महावाक्य म्हणजे ‘ते ब्रम्ह तूच आहेस’ हे शाब्दिक ज्ञान आहे. मी ब्रम्ह आहे. मी ब्रम्ह आहे, सोऽहं, सोऽहं असा कुणी कितीही उदघोष केला तरी जोपर्यंत त्या ब्रम्हाची प्रत्यक्ष अनुभूती देणारा समर्थ सदगुरू भेटत नाही तोपर्यंत त्या शाब्दिक ज्ञानाला काहीही महत्व नाही. उदाहरणार्थ रसायनशास्त्राचा एक प्रयोग आहे H2+O=H2O. प्रयोगशाळेत योग्य अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग न करता आपण H2O चा कितीही जप केला तरी H2O काही तयार होणार नाही.

महायोग विज्ञानाच सुद्धा असच आहे. तुम्ही कितीही ‘मी ब्रम्ह आहे’, ‘मी ब्रम्ह आहे’ असा जप करा पण जोपर्यंत तुम्ही योग्य सदगुरूच्या सानिध्यात महायोग विज्ञानाचे प्रयोग करत नाही तोपर्यंत तुम्हांला ‘अहं ब्रम्हास्मि’ ची अनुभूती कधीही येणार नाही. सदगुरू हे शक्तीसंपन्न असतात. महायोग विज्ञान त्यांनी पूर्ण आत्मसात केलेले असल्यामुळे ते काही मिनिटातच सुप्त असलेल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करून आपल्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त करून देऊ शकतात. त्यासाठी देश, काळ, वय, जात, धर्म, पंथ व संप्रदाय या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसते. महायोग हे विज्ञान असल्यामुळे त्याची अनुभूती घेण्यासाठी कुणालाही, कसल्याही प्रकारचे बंधन नाही. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश सर्वांसाठी आहे त्याचप्रमाणे ईश्वरीय ज्ञान व ईश्वरीय अनुभूती सर्वांसाठी आहे व ती सर्वांना येऊ शकते. महायोग हे विज्ञान आहे हे सत्य मान्य केल्या नंतर शास्त्र हे बोलण्यासाठी अथवा दुसऱ्यांना सांगण्यासाठी नसून ते प्रायोगिक असतात हे दुसरे सत्य सुद्धा आपल्याला मान्य करावे लागेल.

आपल्याला ज्ञात असलेल्या प्रकाश लहरी मधला केवळ एक छोटासा भाग रंगरूपाने आपल्याला दिसत असतो. यथार्थ ज्ञान हे मनबुद्धीच्या अतीत आहे. मन बुद्धीच्या पलीकडे जाण्यासाठी जे साधन आहे ते अतींद्रिय स्वरूपाचे आहे. ह्या अतींद्रिय स्वरूपाचे विश्लेषण करणारे जे विज्ञान आहे त्या विज्ञानालाच महायोग विज्ञान म्हणतात.

महायोग हे विज्ञान आहे, महायोग विज्ञान सिद्ध करण्याची सुद्धा एक प्रायोगिक पद्धत आहे. अर्थात इतर सर्व विज्ञान शास्त्राप्रमाणे त्याची प्रायोगिक पद्धती थोडी वेगळी आहे. पदार्थ विज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञान शास्त्र, मानसशास्त्र, खगोलशास्त्र या सर्व विज्ञान शास्त्रांच्या प्रायोगिक पद्धती एकसारख्या नाहीत. पदार्थ विज्ञान शास्त्राची प्रयोगपद्धती मनोविज्ञानाच्या प्रयोग पद्धतीहून वेगळी आहे आणि असायलाच पाहिजे. कारण ज्या विज्ञानाचे जे क्षेत्र आहे त्या विज्ञानाने त्या आपल्या विशिष्ठ क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रानुसारच्या स्वतःच्या विशिष्ट पद्धतीने प्रयोग करून आपले सिद्धांत मांडावयास हवेत.

पदार्थशास्त्र, रसायनशास्त्र विज्ञानाचे भौतिक जगत हे क्षेत्र आहे आणि तद्नुरूप त्यांच्या प्रायोगिक पद्धतीही भौतिक आणि इंद्रियजन्य आहेत. महायोग विज्ञानाचे क्षेत्र मनोजगत आहे आणि तद्नुरूप त्याच्या प्रायोगिक पद्धती सुद्धा मानसिक आणि इंद्रियातीत आहेत. विज्ञानाप्रमाणे महायोग विज्ञाना मध्येही आपल्याला कित्येक अध्यात्मिक क्रिया वा घटना प्रत्यक्ष प्रायोगिक पद्धतीने कराव्या लागतील व त्यांचे अनुभव घ्यावे लागतील. महायोग विज्ञानाचा अर्थात भक्ती विज्ञानाचा अनुभव न घेता विश्वास ठेवला तर आपली अवनती झाल्याशिवाय राहणार नाही.

– प्रस्तुत लेख गुरुराज ओंकार महाराज लिखित ‘महायोग विज्ञान’ या ग्रंथातून घेतला आहे.

महायोग

Blog placeholder

हे जग लेच्यापेच्या लोकांचे नाही. गीता सांगते जीवन संघर्षमय आहे. तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला जर जगायचं असेल, स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. कृष्ण अर्जुनाला सांगतो, अर्जुना तुला हा दुबळेपणा शोभत नाही तू पुरुष आहेस.  ऊठ आणि पुरुषार्थ कर. महायोग विज्ञानाचा मार्ग हा पुरुषार्थाचा मार्ग आहे. देव, दैव, नशीब यांच्या नावाने खडे फोडत बसण्यापेक्षा स्वतःमधील अंतर शक्ती जागृत करा. महायोग विज्ञानाचे प्रयोग करून स्वतःला एवढा शक्तीमान बनवा की स्वतः ईश्वराने येऊन तुम्हाला विचारल पाहिजे की बेटा तुला काय पाहिजे.

या जगामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता, प्राप्त करून घेऊ शकता. तुम्हाला अशक्य काही नाही Everything Is Possible. सर्व काही शक्य आहे. फक्त तुम्हाला जे पाहिजे त्याच्या लायक तुम्ही स्वतःला बनवलं पाहिजे. तुमच्यामध्ये सुप्त असणारी शक्ती, सुप्त असणारे ज्ञान व सुप्त असणारा आत्मविश्वास तुम्ही जागृत केला पाहिजे. आपल्यामध्ये असणारे सुप्त ज्ञान, सुप्त शक्ती व आत्मविश्वास जागृत करण्यासाठी महायोग विज्ञान जाणून घेण आवश्यक आहे.

महायोग म्हणजे सर्व योगा मधील श्रेष्ठ असा योग. या पृथ्वीवर या योगापेक्षा दुसरा श्रेष्ठ योग नाही. कारण या एकाच योगात इतर सर्व योगांचा व उपासनांचा समावेश झाला आहे. एवढेच नव्हे तर इतर कोणत्याही साधनात कुंडलिनी शक्ती जागृत होऊन अनुभव येण्यास वेळ जातो. महायोगामुळे मात्र कुंडलीनी शक्ती जागृतीचे फळ तात्काळ मिळून नाना प्रकारचे दिव्य अनुभव साधकाला येऊन ब्रम्हप्राप्ती अगदी सहज होते.

या महायोगाचा महिमा अत्यंत अदभूत आहे. इतर अनेक योग योगी लोकांनी सांगीतले आहेत. मात्र महायोग हा स्वतः भगवान आदिनाथांनी सांगितला आहे. त्याचे प्रवर्तक स्वतः महायोगी भगवान आदिनाथ आहेत. म्हणून या महायोगाशी इतर कोणत्याही योगाबरोबर तुलना होऊ शकत नाही. या भूतलावर जितके योग प्रचलित आहेत त्या सर्व योगात भगवान शंकरांकडून प्रवर्तित झालेला महायोग हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग आहे.

महायोगा व्यतिरिक्त इतर जे अनेक योग आहेत. त्याने आत्मसिद्धी प्राप्त होत नाही. इतर रिद्धी-सिद्धी प्राप्त होतात व साधकाच्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो व साधक आत्मसाक्षात्कारा पासून भ्रष्ट होतो. त्यामुळे इतर योगमार्गाने मनुष्यास ईश्वरी साक्षात्कार होत नाही. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे योगी चांगदेव महाराज. चांगदेवाने हठयोगाच्या माध्यमातून अनेक रिद्धी-सिद्धी प्राप्त केल्या होत्या. असे म्हणतात की, मेलेले मुडदे सुद्धा चांगदेवाच्या स्पर्शाने जिवंत व्हायचे तर अशा चांगदेवाला सुद्धा आत्मसाक्षात्कारा साठी ज्ञानेश्वरांना शरण जावं लागलं कारण ज्ञानेश्वर स्वतः महायोगाचे उपासक होते व हा महायोग त्यांना आदिगुरु शंकरा पासून प्राप्त झाला होता. इतर योगाची साधना करणारे योगी ईश्वरी साक्षात्कार प्राप्त करून घेऊ शकत नाही. तर केवळ महायोगानेच सर्व जीव ईश्वरी साक्षात्कार व आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेऊ शकतात. याबाबत तिळमात्र शंका नाही. महायोग हा सिध्दमार्ग आहे. सिध्दमार्ग म्हणजे सिध्द असा मार्ग.  राजमार्गा सारखा तयार रस्ता. राजमार्गा वरून चालताना माणसाला कष्ट पडत नाही, त्रास होत नाही व तो मुक्कामाला नक्की सुखरूप पोहोचतो. एकदा राजमार्ग भेटल्या नंतर आडवे तिडवे फाटे फुटत नाहीत. मार्ग चुकण्याची भीती नाहीसी होते. या मार्गाने विनासायास योगाची प्राप्ती होते. योग प्राप्त झाला की शक्ती ची प्राप्ती होते, शक्तीतून भक्ती प्रगट होते, भक्ती मधून आत्म विस्तार होतो व मनुष्याचा उद्धार होतो.

हा महायोग ज्यावेळी गुरुकृपा होते त्यावेळी दृष्टीस पडतो. हा अतिशय गुह्य असा मार्ग आहे परंतु गुरुकृपा झाल्यावर अतिशय गुह्य असणारा हा मार्ग मात्र आपल्या दृष्टीपथास येतो. या मार्गाने साधक चालू लागला की तहान भूक विसरून जातो. त्याला रात्र व दिवस यांची आठवण राहत नाही. साधकाला रात्रंदिवस साधना करावी वाटते. एकदा का डोळे बंद केले की पुन्हा उघडण्याची इच्छा राहत नाही. गुळाला मुंगळा जसा चिकटतो तसाच साधक साधनेला चिकटून बसतो. त्याला त्यामध्ये एवढी गोडी निर्माण होते की इतर भौतिक सुख या आत्मसुखा पुढे त्याला तुच्छ वाटू लागतात.

सदगुरू असा सिद्ध योग साधकाला देतात. साधकाचे काम एवढेच की त्याने डोळे मिटून स्वस्थ बसायचे व प्राणायामाच्या माध्यमातून अक्षरब्रम्हाचा मनात जप करायचा बस्स! बाकी काही करायचे नाही जे काही होईल ते फक्त साक्षी होऊन पहायचे. साधक अशा प्रकारे पूर्ण शरण आला की सदगुरू कृपेने मुलाधारात निवास करणाऱ्या कुंडलीनी शक्तीचे संचलन सुरु होते. त्यामुळे हठयोग, मंत्रयोग, लययोग इत्यादी सर्व योग स्वाभाविक रीतीने आपोआप साधू लागतात. हे योग मुद्दाम स्वतंत्र रीतीने करण्याची गरज लागत नाही. आसन, मुद्रा, प्राणायाम, जप, अनुष्ठान, ध्यान-धारणा इत्यादी कोणतीही क्रिया स्वतःहून करण्याचे कारण उरत नाही. सर्व प्रकारच्या योगांचा व उपासनांचा अंतिम हेतू हा कुंडलीनी शक्ती जागृत करणे हा असतो. हा हेतू गुरूच्या कृपेने सहज साध्य होतो व तत्काळ कुंडलीनी जागृतीची अनुभूती येण्यास सुरुवात होते. महायोगाला सहज योग असेही म्हटले जाते. सहजयोग म्हणजे सहज होणारा योग. या योगात अवघड असे काही नाही. जे काही या महायोगात आहे. ते सर्व सोपे, साधे, सरळ व स्वाभाविक असे आहे. या महायोगात अस्वाभाविक असे काहीही नाही. मुद्दाम बलपूर्वक एकही गोष्ट या योगात करावी लागत नाही. महायोगामध्ये साधकाला कोणत्याही आपत्तीची शंका नसते.

शक्ती जागृत झाली की सर्व शरीर थरथर कापणे, उड्या मारणे, हसणे, रडणे, घाम येणे, रोमांच उभे राहणे, मन प्रसन्न होणे, आनंदित होणे, निरनिराळ्या तऱ्हेची आसने, बंध, मुद्रा, प्राणायम होणे इत्यादी क्रिया आपोआप होऊ लागतात व कुंडलीनी शक्ती जागृत होते आणि मनुष्य अखेर सिध्द होतो. त्याला अशक्य असं काही राहत नाही. जीवनामध्ये जर यशस्वी, शक्तिमान, एैश्वर्यवान व्हाव असं वाटत असेल तर महायोग विज्ञानाचे प्रयोग करा.

– प्रस्तुत लेख गुरुराज ओंकार महाराज लिखित ‘महायोग विज्ञान’ या ग्रंथातून घेतला आहे.