Logo Omkar Mission Dombivali

गुरुराज ओंकार महाराज

Gururaj Omkar Maharaj

 

ओंकार मिशनचे संस्थापक व महायोग विज्ञान या पुस्तकाचे लेखक गुरुराज ओंकार महाराज यांचा जन्म डोंबिवली शहरा मधील सोनारपाडा या गावामध्ये झाला. लहानपणापासून त्यांना अध्यात्माची आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांना ध्यानबिंदू दिसू लागला व समाधी लागू लागली. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांची कुंडलीनी शक्ति जागृत झाली व ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांप्रमाणे त्यांच्या मुखामधून शेकडो अभंग बाहेर पडू लागले. आपले अध्यात्मिक अनुभव जगासमोर मांडण्यासाठी त्यांनी ‘भक्तीरहस्य’ हे पुस्तक लिहिले. ‘राहुरी कृषी विद्यापीठ’ नगर येथे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते ‘ओंकार महाराज’ म्हणून नावारूपाला आले.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी स्वामी विवेकानंदांचे अध्यात्मा वरील दहाही खंड वाचून काढले. तत्वज्ञान, मानसशास्त्र, इतिहास, प्राचीन विज्ञान, आधुनिक विज्ञान व क्वान्टम थिअरी त्यांनी पूर्णपणे आत्मसात केली व संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये विज्ञानातून अध्यात्माचा प्रचार केला. बी. ए. ला असताना त्यांनी ‘विज्ञानातून अध्यात्म’ हे आपले दुसरे पुस्तक प्रकाशित केले. अनेक शास्त्रज्ञांनी(Scientist) त्यांच्या बरोबर चर्चा केली. अक्षरब्रह्म शक्तिपाताच्या सामर्थ्याने कुंडलीनी शक्ति जागृत करून ओंकार महाराजांनी शास्त्रज्ञांना अध्यात्मिक शक्तिचा अनुभव करून दिला.

ओंकार महाराजांच्या अध्यात्मिक शक्तीचा डंका आता सगळीकडे वाजू लागला. समाजा मधील उच्च विद्या विभूषित डॉक्टर, वकील, प्रोफेसर्स, इंजिनिअर्स, वैज्ञानिक, उद्योजक इत्यादी मंडळी स्वतःला ओंकार महाराज यांचे शिष्य म्हणवून घेण्यात धन्यता मानू लागली. ओंकार महाराजांचा आदर्श होता भगवान कृष्ण. ज्याने स्वतःच्या कर्तुत्वाने द्वारका उभी केली होती. एम.ए. झाल्यानंतर त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरु केला व अल्पावधीतच एक यशस्वी उद्योजक म्हणून ते नावारूपास आले. पैसा, वैभव, एैश्वर्य त्यांच्या पायाशी लोळण घेवू लागले. परंतु यामध्ये त्यांना रस नव्हता. ते दिवसभर व्यवसाय करायचे व रात्रभर ध्यान करीत बसायचे. एक अज्ञात अध्यात्मिक शक्ती त्यांना सतत मार्गदर्शन करीत असायची. या काळामध्ये बारा वर्षे त्यांनी अखंड साधना केली. या काळामध्ये त्यांनी कोणत्याही अध्यात्मिक ग्रंथाचे वा पुस्तकाचे वाचन केले नाही. त्यांनी जगाचे निरीक्षण करायला सुरुवात केली. या निरीक्षणातून त्यांना Practical Philosophy, Independ Philosophy, Double Dimension Philosophy, Universal Philosophy अशा एकाहून एक अशा श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा साक्षात्कार झाला.

सत्य हे स्वसंवेद्य असून ते सिद्ध करण्यासाठी कुठल्याही प्रमाणाची आवश्यकता नाही याची त्यांना अनुभूती आली. वेद, उपनिषद, बायबल, कुराण यांच्या पलीकडे असलेल्या सत्याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. ज्या अज्ञात शक्तीने आपल्याला हे अलौकिक ज्ञान दिले त्या शक्तीचा शोध व तिचा साक्षात्कार करून घेण्याचा अट्टाहास त्यांनी धरला. महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्री त्यांची साधना सुरु असताना आपल्या आजूबाजूला काही अदृश्य शक्ती वावरत असल्याची त्यांना जाणीव झाली. डोळे उघडून पहिले तर आजूबाजूला चित्र विचित्र आकृती उभ्या होत्या. त्या आकृती पाहून त्यांना दरदरून घाम फुटला.

एवढ्यात अंतरात्म्यातून आवाज आला, भिऊ नकोस, भुतं आली आहेत म्हणजे भूतनाथ सुद्धा येणार आहे, सावध हो. दुसऱ्याच क्षणी कर्पुरासारखा वर्ण असलेले तेजःपुंज साक्षात भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले. ओंकार महाराजांना ते तेज सहन झाले नाही. ते मूर्च्छित होवून पडले. शुद्धीवर आल्यानंतर आपण जे काही पहिले जे काही अनुभवले ते सत्य होते की  कल्पना हे त्याना समजेना. एवढ्यात त्यांच्या अंतरात्म्यातून आवाज आला, सर्व गुरूंचा महागुरू तुझ्या आतमध्ये बसला आहे. तो सर्व नाथांचा आदिनाथ आहे. त्याने तुझ्याकडून महायोग विज्ञान सिद्ध करून घेतले आहे. तू कुंडलीनी शक्ति धारण केली आहेस. तुझ्या हातून अलौकिक कार्य होणार आहे. तुला आपल्या गुरूच्या ऋणातून मुक्त व्हायचे असेल तर लोकांना सत्याचा अनुभव दे. ओंकार महाराज हे एक सिद्ध पुरुष आहेत. ते महायोगी व महाज्ञानी आहेत. आपल्या गुरूच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, जगाला सत्याची अनुभूती देण्यासाठी ओंकार महाराज यांनी ‘ओंकार मिशनची’ स्थापना केली. आजपर्यंत हजारो लोकांनी ओंकार महाराजांच्या सानिध्यात कुंडलीनी शक्ति जागृतीचा अनुभव घेतलेला आहे. ओंकार मिशनच्या ह्या छोट्याशा बीजाचे आज प्रचंड वृक्षामध्ये रुपांतर झालेले आहे.

– प्रस्तुत लेख गुरुराज ओंकार महाराज लिखित ‘महायोग विज्ञान’ या ग्रंथातून घेतला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *