Logo Omkar Mission Dombivali

June, 2015

now browsing by month

 

नाम

Blog placeholder

समस्त विश्वब्रम्हांडामध्ये ऊर्जा ओतप्रोत भरलेली आहे. ऊर्जा एकच आहे. आपल्याला मात्र ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये व गतीमध्ये अभिव्यक्त होत असताना दिसत असते. यापैकी प्रत्येक ऊर्जेची दिशा व गती वेगवेगळी असते. विश्वब्रम्हांडामध्ये अनंत स्वरूपामध्ये भासत असणारी ही ऊर्जा ज्यावेळेला घनीभूत अवस्थेला प्राप्त होते त्यावेळी त्या वैश्विक ऊर्जेला जो आकार प्राप्त होतो तो आकार म्हणजेच ॐकार होय. म्हणून ॐ हेच वैश्विक उर्जेचे मूळ स्वरूप आहे.

जप करून, तप करून, योग करून, नमाज पढून, प्रेयर करून जगामधील समस्त धर्म, पंथ, संप्रदाय वैश्विक ऊर्जेचे म्हणजेच ईश्वराचे सत्य स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आधुनिक विज्ञानाने बाह्य प्रकृतीच्या माध्यमातून हेच सत्य जाणण्यासाठी शेकडो सिद्धांत मांडले. हजारो प्रयोग केले. लाखो करोडो रुपयांचा चुराडा करून आधुनिक विज्ञान सुद्धा वैश्विक ऊर्जेचे मूळ स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्यांना यश आले नाही. जगामधील समस्त धर्म, पंथ व संप्रदायांनी हेच सत्य जाणण्यासाठी वेगवेगळी कर्मकांड, उपासना पद्धती व योगिक प्रक्रिया निर्माण केल्या. परंतु त्यांना सुद्धा यश प्राप्त झाले नाही. एकीकडे विज्ञानाने मानवाला विनाशाच्या सर्वोच्च शिखरावर नेवून ठेवले आहे तर दुसरीकडे धर्म समाजामध्ये द्वेश निर्माण करून रोज मनुष्याचा नर संहार करत आहे. म्हणूनच कधी नव्हे तेवढी आज सत्य जाणण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

अणूचे विभाजन कोठेही करता येत नाही, अणुच्या विभाजनासाठी आपल्याला अणुसंशोधन केंद्रामध्येच (Atomic Research Center) जावे लागते. अणु संशोधन केंद्रामध्ये अणूला Reactor मध्ये टाकले जाते. अणूच्या केंद्रावर (nucleus) अल्फा किरणांचा मारा झाल्यानंतर अणूचे विभाजन होते व अणुमधून प्रचंड शक्ती बाहेर पडते. ज्याप्रमाणे अणूचे विभाजन अणुसंशोधन केंद्रामध्येच केले जाते व अणूचे विभाजन होण्यासाठी अल्फा किरणांचाच मारा करावा लागतो त्याप्रमाणे अध्यात्मामध्ये सुद्धा वैश्विक ऊर्जेची अनुभूती घेण्यासाठी ध्यानकेंद्रा मध्येच जावे लागते व मूलाधार चक्रावर अक्षर ब्रम्हाचाच मारा करावा लागतो.

ध्यानकेंद्रामध्ये मूलाधारस्थित निद्रिस्त असलेल्या शक्तीवर ज्यावेळी अक्षर ब्रम्हाचा मारा होतो त्यावेळी निद्रिस्त असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होते व प्रचंड अध्यात्मिक ऊर्जेचा आपणास अनुभव येतो. शरीरामधील एकेक चक्रे जागृत होतात, षडचक्राचे भेदन करून कुंडलिनी शक्ती शिवाशी एकरूप होते. ज्यावेळी शिव आणि शक्तीचे मिलन होते त्यावेळी देश, काल, वस्तू हा भेद मावळून जातो. मन उन्मन होत व या समस्त विश्व ब्रम्हांडामध्ये शुभ्र धवल वर्णाने, पांढुर वर्णाने विराजमान असणाऱ्या ऊर्जेची पांडुरंगाची अनुभूती येते. करोडो रुपये खर्च न करता कुठलीही साधना न करता केवळ नामाच्या सामर्थ्याने मनुष्य वैश्विक ऊर्जेची अनुभूती प्राप्त करू शकतो. परंतु नामाचा अनुभव समर्थ सदगुरूच्या समर्थ शक्तीपातानेच संभव आहे.

सदगुरू हे शक्ती संपन्न असतात, ते ज्यावेळी शिष्याला अनुग्रह देतात त्यावेळी ते शिष्याला नामाचा उपदेश करतात. शिष्य ज्यावेळी त्या नामाचा जप करतो त्यावेळी शक्तीपुंजीत झालेल्या शब्दाने शिष्याची आंतरिक ऊर्जा (कुंडलिनी शक्ती) जागृत होते. जोरजोरात श्वासोच्छ्वास होऊ लागतो, शरीरामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते, अंगाला दरदरून घाम येतो, शक्तीच्या प्रचंड आवेगाने शरीर ताडताड उडायला लागते. कठोर असणारे अंतःकरण मेणासारखे मऊ होते, डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला सुरुवात होते. संपूर्ण अष्टसात्विक भाव जागृत होतात. हीच नामाची सर्वश्रेष्ठ अनुभूती होय. सदगुरूंच्या कृपेने ज्या नामाने ही सर्वश्रेष्ठ अनुभूती प्राप्त होते ते नाम हेच खरे नाम होय.

||ॐ तत सत |ॐ तत सत |ॐ तत सत ||

– प्रस्तुत लेख ओंकार महाराज लिखित ‘ओंकार गाथा’ मधील ‘नाम’ या प्रकरणातून घेतला आहे.