Logo Omkar Mission Dombivali

March, 2015

now browsing by month

 

मूळाधार चक्र

Blog placeholder

या समस्त सृष्टीचा जो मुळ आधार आहे तो मूल आधार म्हणजे मूळाधार चक्र होय. मूळाधार चक्राची देवता शनि आहे. या मूळाधार चक्रामध्ये आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, सुप्त अवस्थेमध्ये असतात. प्रत्येकाला मोठे होण्याची इच्छा असते. प्रत्येकाला कर्तृत्वाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होण्याची आकांक्षा असते. परंतु फक्त इच्छा व आकांक्षा असून कोणीही मोठा होत नाही. त्यासाठी शक्तीचीसुद्धा आवश्यकता असते. इच्छेला जर शक्तीची जोड भेटली तर या जगामध्ये अशक्य असे काही नाही. मनुष्याच्या समस्त इच्छा व आकांक्षा या मुळाधारामध्ये आहेत.

जप, तप, योग इत्यादींच्या माध्यमातून आपण आपल्यामध्ये असणारी कुंडलिनी शक्ती जागृत करू शकतो. परंतु त्यासाठी किती काळ जाईल हे सांगता येत नाही. मग सर्वसामान्यांसाठी काही मार्ग नाही का? आहे, हा मार्ग आहे भक्तीचा, सेवेचा, समर्पणाचा. पुरुषार्थाचा अवलंब करून माणुस जेथे पोहोचतो, सेवा व समर्पणाने सुद्धा माणुस तेथेच पोहोचतो. फक्त तुमची श्रद्धा पाहिजे.

जो श्रद्धावान असतो त्यालाच ज्ञानाचा व शक्तीचा लाभ होतो. तोच यशस्वी होतो. ज्यांच्यामध्ये पुरुषार्थ आहे अशा लोकांनी भौतिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कष्ट, मेहनत करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. परंतु जे दिन दुबळे आहेत ते जर मोठयांच्या आश्रयाखाली राहिले त्यांनी सेवा, समर्पण व प्रामाणिकपणा यांच्या जोरावर मोठयांची मने जिंकून घेतली तर मोठी माणसे त्यांचा योगक्षेम वाहतात. जो मोठ्यांना शरण जातो, त्यांची सेवा करतो, त्यांच्या प्रति समर्पित होतो अशांना मोठी माणसं, यशस्वी माणसं, कर्तृत्वान माणसं, ऐश्वर्यवान व्यक्ती त्यांना जीवनांमध्ये काही ही कमी पडू देत नाहीत. कारण मोठ्यांना सुद्धा आपला कारभार सांभाळण्यासाठी दैवी गुण असणार्‍या व्यक्तीची गरज असते.

परमार्थामध्ये सुद्धा असेच आहे. ज्यांच्यामध्ये पुरुषार्थ आहे ते लोक जप तप व योगाच्या माध्यामातून आपला भौतिक व अध्यात्मिक विकास साधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु जे दीन, दुबळे, पतीत आहेत त्यांचा मार्ग आहे भक्तीचा, सेवेचा, समर्पणाचा. शनिदेव सर्वशक्तिमान आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, जागृत आहे. कलीयुगामध्ये बर्‍याच देवता ह्या निद्रीत स्वरुपात पहुडलेल्या आहेत. त्यांना जर जागृत करायचं असेल तर बारा बारा वर्ष तपश्चर्या करावी लागते. लाखो कोटी मंत्रांचा जप करावा लागतो, तेव्हा कुठे मंत्र सामर्थ्याने ह्या देवता जागृत होतात व आपल्या भक्तांना त्यांच्या तपश्चर्येचे फळ देतात. परंतु शनिदेव हे मुळातच जागृत आहेत. कलीयुगामध्ये अखंड जागृत असणारा एकमेव देव म्हणजे शनिदेव.

जागृत आहे म्हणून प्रत्येक राशीमध्ये भ्रमण करत आहे. जागृत नसता तर भ्रमण केले असते का? म्हणून शनिदेवाला तपश्चर्या करून अथवा मंत्रशक्तीच्या माध्यमातून जागृत करण्याची आवश्यकता नाही. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आवश्यकता आहे सेवेची, समर्पणाची आणि प्रेमाची. शनिदेवाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येते की शनिदेवाला लहानपणीच सर्वांनी झिडकारले होते. त्यामुळे शनिदेव हे आत्मकेंद्रित असतात. भगवान शंकराकडून प्राप्त झालेल्या अनाहत नादामध्ये अखंड रमलेले असतात. भगवान शंकराने दिलेल्या दिव्य बोधावर सोsहं बोधावर स्थिर असतात.परंतु कुठेतरी मनाच्या कोपर्‍यामध्ये आपुलकी, प्रेम, यासाठी आसुसलेले असतात.

ईश्वर हा प्रेमाचा भुकेला आहे. त्याला आणखी काही नको. एखादा महाज्ञानी, महायोगी जो सोsहं भावामध्ये आकंठ बुडालेला आहे परंतु भक्तीच्या सुखासाठी तो ज्यावेळी शनिदेवाच्या भक्तीला लागतो, त्यांची नित्य उपासना, सेवा करतो त्यावेळी ते समस्त ऐश्वर्याने त्याच्यासमोर प्रकट होतात. असा जो महायोगी असतो तो आपल्या भक्तीच्या व योगाच्या अलौकिक सामर्थ्याने जसा पुंडलीकाने प्रत्यक्ष परमात्म्याला विटेवर उभा केला आहे तसा तो परमात्म्याला आपल्या अलौकिक अध्यात्मिक शक्तीच्या जोरावर उभा करतो.

इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. असाच नवीन इतिहास शनैश्वर संस्थान, डोंबिवली येथे घडला आहे. एका महायोग्याने आपल्या अध्यात्मिक सामर्थ्याच्या जोरावर जसा पुंडलीकाने पांडुरंगाला विटेवर उभा केला आहे तसाच शनैश्वर संस्थान, डोंबिवली येथे शनी देव उभा आहे. येथील शनिदेवाची शिळा ही शिळा नसून ते शक्तीकुंड आहे. ह्या शक्तीकुंडामधून उर्जा अहोरात्र प्रवाहित होत असते. तुम्ही या शक्तीपीठामध्ये असलेल्या शक्तीकुंडाची, भगवान शनीच्या शिळेची नित्य उपासना, पूजा, सेवा केली तर शक्तीकुंडामधून शिळेमधून प्रवाहित होणार्‍या शक्तीने, उर्जेने तुमचे मूळाधार चक्र जागृत होऊन थोड्याच काळामध्ये तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास सुरुवात होते. जसजशी तुमची साधना वाढेल तसतशी तुमची भौतिक व अध्यात्मिक अशी दोन्ही प्रगती लोकांच्या नजरेत येण्यास सुरुवात होते. म्हणून कुठलाही योग न करता फक्त सेवा व समर्पण या माध्यमातून तुम्ही शनिच्या शीळेची, शक्तीकुंडाची उपासना करून योग साधु शकता.

मुलाधाराची देवता शनि आहे व मुलाधारामध्येच आपल्या इच्छा आकांक्षा सुप्त स्वरुपात आहेत. शनिदेवाच्या स्वयंभु जागृत शिळेच्या शक्तीकुंडाच्या उपासनेने आपल्या इच्छा व आकांक्षाना गती भेटते व संसारामध्ये राहुन माणुस भौतिक व अध्यात्मिक असा दोन्ही विकास साधु शकतो. परमार्थ करणार्‍या बर्‍याच लोकांना हे रहस्य माहित नाही. त्यामुळे हे पारमार्थिक लोक कनिष्ठ देवता म्हणुन शनिदेवाला हिणवतात, तुच्छ समजतात. शनीची उपासना म्हणजे सामान्य ग्रहाची उपासना समजतात. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगायला लागतात.

वास्तविक शनीची उपासना ही सामान्य ग्रहाची उपासना नसून ती मूलाधार चक्राची उपासना आहे. अध्यात्मा मध्ये या मूलाधार चक्राला फार महत्व आहे. मूलाधार चक्राच्या जागृतीनेच मनुष्याच्या अध्यात्मिक जीवनाला सुरुवात होत असते व मूलाधार चक्राच्या जागृतीनेच मनुष्याच्या भौतिक विकासाला सुरुवात होत असते कारण मनुष्याच्या सुप्त असणाऱ्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्याची शक्ती फक्त मूलाधार चक्रामध्येच आहे. ज्यांचा ज्यांचा भौतिक व अध्यात्मिक विकास झाला आहे त्यांचा तो विकास मूलाधार चक्राच्या जागृतीनेच झाला आहे. हे रहस्य आपणास माहित असो वा नसो, पण सत्य हेच आहे. जाणता अथवा अजाणता भौतिक वा अध्यात्मिक जीवनामध्ये यशस्वी असणाऱ्या व्यक्तींनी मूलाधार चक्राचीच उपासना केलेली असते.

हे मूलाधार चक्र श्रद्धा, सेवा, समर्पण या माध्यमातूनच विकसित होत असते. तुम्ही कोणावर श्रद्धा ठेवली आहे याला महत्व नाही, तुमची श्रद्धा किती दृढ आहे याला जास्त महत्व आहे. तुम्ही कोणाची सेवा केली याला महत्व नाही, तुम्ही किती निस्वार्थ भावनेने सेवा केली आहे याला महत्व आहे. तुमचे समर्पण कोणाशी निगडीत आहे याला महत्व नाही, तुमचे समर्पण संपूर्ण भावाने आहे की नाही याला महत्व आहे. भौतिक व अध्यात्मिक जीवनामध्ये यशस्वी झालेल्या मनुष्याची कोणावर ना कोणावर श्रद्धा असते मग ती श्रद्धा व्यक्तीनिष्ठ असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीशी निगडीत असेल अथवा आत्मनिष्ठ म्हणजे स्वतःशीच निगडीत असेल. ज्या माणसाचा स्वतःवर विश्वास नाही तो मनुष्य या जगामध्ये काहीच करू शकत नाही. म्हणून व्यक्तीनिष्ठ श्रद्धे बरोबर आत्मनिष्ठ श्रद्धा सुद्धा तेव्हढीच महत्वाची आहे.

पुरुषार्थाला परमार्थाची जोड पाहिजे व परमार्थाला पुरुषार्थाची जोड पाहिजे. तरच भौतिक व अध्यात्मिक अशी दोन्ही प्रगती साधून माणूस जिवंतपणीच आपले घर स्वर्ग बनवू शकतो. हेच आमचे शनी विज्ञान आहे. हे शनिविज्ञान आत्मसात करा, त्याचे प्रयोग करा. फक्त देव-देव करत बसू नका. कष्ट करा, मेहनत करा, पुरुषार्थ करा. शनिदेवाची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आपल्या पुरुषार्थाने सर्व काही मिळविले आहे, त्यांनी मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो या समाजाचे काही देणे लागतो ह्या भावनेने दीन, दुबळे, पतित यांची सेवा करावी. म्हणजे शनिदेवाची त्यांच्यावर अवकृपा होणार नाही. थोडक्यात शनिदेवाची अवकृपा टाळून शनिदेवाची कृपा संपादन करण्याचे जे ज्ञान आहे तेच हे शनिविज्ञान.

 – प्रस्तुत लेख ओंकार महाराज लिखित ‘शनी विज्ञान’ या पुस्तका मधून घेतला आहे

कुंडलिनी शक्ती

Blog placeholder

कुंडलिनी शक्ती

शास्त्रज्ञांच्या मते हे विश्व म्हणजे शक्तीक्षेत्र आहे. विश्व अंतर्बाह्य स्फुरण पावणारे गतिमान व परिवर्तनशील आहे. विश्वाच्या प्रत्येक पदार्थात अणूंच्या इलेक्ट्रॉनचे भ्रमण स्पंदन सुरु आहे. ग्रह उपग्रह ताऱ्यांचे भ्रमण सुरु आहे. आपल्या आकाशगंगे सारख्या लक्षावधी आकाशगंगा आपल्या ब्रम्हांडामध्ये आहेत व एकेका आकाशगंगेत लक्षावधी ग्रह तारे आहेत. अणूच्या गर्भापासून ते थेट आकाशगंगेपर्यंत हे विश्व भ्रमणशील आहे चैतन्यमय आहे.

आकाशगंगेतही नवीन तारे जन्मास येत असतात. काही नष्ट होत असतात. काही आकुंचन पावत असतात. काही प्रसरण पावत असतात. काही उष्ण होत असतात. काही थंड होत असतात. सर्व आकाशगंगा एकमेकांपासून अजस्त्र वेगाने दूर जात आहेत. शास्त्रज्ञांच्या मते काही काळानंतर त्यांचे दूर जाणे थांबेल व त्या उलट दिशेने प्रवास करतील त्यांच्या मध्ये आण्विक स्फोट होतील व संपूर्ण विश्वाचा संहार होईल. नंतर परत विश्वाची उभारणी सुरु होईल. ज्या शक्तीच्या सहाय्याने विश्वाची निर्मिती होते त्याच शक्तीच्या माध्यमातून विश्वाचा संहार होतो.

विश्वनिर्मिती म्हणजे क्रमविकास व विश्वसंहार म्हणजे क्रमसंकोचन. अशा प्रकारे क्रमविकास व क्रमसंकोचन अनंतकाळापासून सुरु आहे. क्रमविकास अवस्था सुरु झाल्यावर ब्रम्हांडाची निर्मिती होते. ब्रम्हांडाची रचना केल्यावर जी शक्ति शिल्लक राहते ती अणुस्वरूप धारण करण्याकरिता चक्राकार फिरू लागते. तिच्या चक्राकार स्वरुपामुळेच तिला कुंडलाकार प्राप्त होतो. हीच विश्वनिर्मिती भगवती कुंडलिनी शक्ती होय.

कुंडलिनीचे स्वरूप

कुंडलिनी म्हणजे चितशक्ती पराशक्ती शब्दब्रम्हाची स्फूर्ती होय. योगवसिष्ठ ग्रंथामध्ये निर्वाण प्रकरणाच्या पूर्वार्धातील ८० व्या सर्गात कुंडलिनी शक्तीचे स्वरूप विवेचन करताना वसिष्ठ म्हणतात शरीरात सुषुन्मा म्हणून एक नाडी आहे ती सभोवार पसरलेल्या तंतूंनी वेष्टित असल्यामुळे परिमंडलातिकार आहे. तिच्यापासून शंभर नाड्या निघाल्या आहेत. कुंडलाच्या आवर्ताखाली तिची रचना आहे. थंडीने व्याकूळ होऊन पडलेल्या मोठ्या सर्पाच्या वेटोळ्याप्रमाणे तिने मंडल केले आहे.

ती शुभ्र आहे. प्राणवायूच्या योगाने एकसारखी स्पंदन पावणारी अशी ती सुषुन्मा नाडी आहे. तिच्या मुळाशी आत कुंडलाच्या आकाराची कुंडलिनी या नावाची चितशक्ती आहे. विणेमधून जशी तार झंकारते त्याप्रमाणे मुळाधारातून अत्यंत सूक्ष्म असा नाद तिच्यातून अनहत ध्वनीच्या रूपाने झंकारत असतो. केळीच्या गाभ्याप्रमाणे कोमल असलेल्या त्या मुलाधारातील ती पराशक्ती कुंडलिनी या नावाने प्रसिद्ध आहे. कारण ती कुंडलाकार धारण करून आहे ती प्राण इंद्रिये मन बुद्धी इत्यादी सर्वांच्या शक्तींना स्फूर्ती देणारी आहे.

अतिशय रागावलेल्या नागिनीप्रमाणे ती एकसारखी आपल्या तोंडाने प्राणाला वर फेकते व अपानाला खाली ओढते. याप्रमाणे ती सदा श्वासोच्छवास प्रक्रियेत निःश्वासरूप होऊन राहिली आहे. कुंडलिनी शक्ती सर्व वृत्तीचे बीज असल्यामुळे प्राणामध्ये क्रियाशक्ती व बुद्धीमध्ये ज्ञानशक्ती उत्पन्न करते. महासागरात जशा नदया विलय पावतात. त्याप्रमाणे तिच्यामध्ये सर्व नाड्या विलय पावतात. प्राणशक्तीस्वरूप मुलाधारस्य कुंडलीनी पासून प्रणवादी सर्व मंत्रांची उत्पत्ती होते. गायत्री मंत्राची उत्पत्ती कुंडलीनी पासून होते हे सांगताना योगचुडामणी उपनिषदांत असे म्हटले आहे की कुंडलिनी शक्ती हि प्राणशक्तीयुक्त अशा गायत्रीचे उत्पत्तीस्थान आहे. प्राण विद्यारुपाने ज्या गायत्रीची उपासना केली जाते ती खरोखर कुंडलिनीच्या रूपाने साकार झालेली महाविद्याच होय. जो या महाविद्येला जाणतो तोच खरा वेदविद्येचे रहस्य जाणतो.

सर्पाला जशी दोन तोंडे असतात त्याप्रमाणे कुंडलिनीला अंतर्मुख व बहिर्मुख अशी दोन मुखे असतात. ती एका मुखाने ब्रम्हव्दार अडवून निद्रा घेते व दुसऱ्या मुखाने ती श्वास-प्रश्वास करते. हाच जीवाचा श्वासोच्छ्वास होय. एका मुखाने ही शक्ती नेहमी जागृत असते. या जागृतीमुळेच जीवाला बाह्य ज्ञान किंवा चेतना चांगल्या रीतीने होते. कुंडलिनीच्या या बहिर्मुख गतीमुळेच जीवाला एकत्वाची जाणीव न होता भिन्नतेची जाणीव होते. कुंडलिनी शक्तीचे अंतर्मुख हे सुप्त किंवा बंद असल्यामुळे जीवाला आपण कोण आहोत हे कळत नाही. त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा कायम अभाव असतो.

अद्वयतापोनिषदात कुंडलिनीचे वर्णन करताना ऋषींनी म्हटले आहे कि देहामध्ये सूर्यासारखी तेजस्वी रूप असलेली व पोर्णीमेच्या चंद्राप्रमाणे शितल असलेली सुषुन्मा नावाची नाडी आहे तिचा आरंभ मुलाधारापासून होऊन ती ब्रम्हरंध्रापर्यंत जाते. या नाडीमध्ये कोटीकोटी विजेप्रमाणे तेजस्वी व कमळाच्या तंतूप्रमाणे सूक्ष्म असलेली कुंडलिनी नावाची प्रसिद्ध शक्ती वास करते.

महानारायण उपनिषदांमध्ये कुंडलिनीचे फार सुंदर वर्णन आले आहे ही कुंडलिनी शक्ती दोन ढगांमध्ये प्रकट होणाऱ्या विद्यूतलतेप्रमाणे तेजस्वी आहे. विजेपेक्षाही चपळ व अत्यंत बलवान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात कुंडलिनी शक्तीचे जे अपूर्व वर्णन केले आहे. ते कुंडलिनीचे स्वरूप समजून घेण्यास अतिशय उपयुक्त असे आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-

नागिणीचे पिले| कुंकुमे नाहले| वळण घेऊन आले| शेजे जैसे ||

कुंकवाने किंवा केशराने न्हालेले नागिणीचे पिल्लू वेटोळे घालून निजलेले असावे त्याप्रमाणे मुळाधारात ती लहानशी सर्पासारखी कुंडलिनी शक्ती साडेतीन वेढे घालून खाली तोंड करून निजलेली असते. ती विजेच्या कंकणाप्रमाणे किंवा अग्निज्वालेच्या घडीप्रमाणे अथवा घोटून चकचकीत केलेल्या सोन्याच्या वेढ्याप्रमाणे नाभीस्कंदात नीट घट्ट व संकोचून बसलेली असते. ती कुंडलिनी जगदंबा आहे. जगाची माता आहे. सार्वभौम चैतन्याची ती ऐश्वर्यरूप शोभा आहे. ती जगद बीजाचा अंकुर जो जीव त्याच्यावर सावली धरते. ती निराकार ब्रह्माची साकार मूर्ती परमात्मा शिवाची संबळी व ओंकाराची जन्मभूमी आहे.

कुंडलिनी शक्ती जेव्हा हृदयापाशी येते. तेव्हा ती आपल्या तेजाची शिदोरी चैतन्याला अर्पण करते म्हणजे ती हृदयस्थ प्राणरूप आत्म्याशी आपल्या तेजासकट एकरूप होते. अर्थात कुंडलिनी आपली तेजरूप कांती टाकून जेव्हा प्राणरूप धारण करते त्यावेळी तिचे स्वरूप पुढील प्रमाणे दिसते. एखाद्या वाळूच्या बाहुलीला सोन्याचा पितांबर पांघरावा व तो सोडून मग तिला वेगळे करून ठेवावे त्याप्रमाणे ती दिसते. वाऱ्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत विझावी किंवा वीज चमकून एकदम आकाशात नाहीशी व्हावी त्याप्रमाणे हृदय कमळापर्यंत जाऊन ती सोन्याच्या सरीसारखी किंवा प्रकाशाचा तेजोमय झरा वाहत असल्याप्रमाणे दिसते. तो शरीररूप तेजाचा झरा हृदयरुपी भूमीच्या पोकळीत एकदम जिरतो व शक्तीचे रूप शक्तीतच विरते. शिवाशी एकरूप झाल्याने ती फक्त प्राणरूपाने जाणली जाते. साऱ्या भौतिकाचा आधार असणारी ही शक्ती अनिर्वचनीय आहे. हीच तिची खरी ओळख आहे. हेच हिचं खर स्वरूप आहे.

कुंडलिनी जागृतीची आवश्यकता

वास्तविक शक्ती एकच आहे. ‘एकोSहं बहुस्यामि’ मी एक आहे मी बहु व्हावं या स्फूर्तीने ती सृष्टीच्या विविध कोटीत रुपांतरीत होते. आधुनिक विज्ञान म्हणत आहे कि उष्णता, विद्युत, चुंबक, गुरुत्वाकर्षण, आकर्षण, अपसारण ह्या एकाच शक्तीची विविधरूपे आहेत. शास्त्रज्ञांनी उर्जा अविनाशाचा सिद्धांत मांडून ही गोष्ट स्पष्ट केली आहे. ते म्हणतात उर्जा निर्माण करता येत नाही तसेच तिचा नाशसुद्धा करता येत नाही. फक्त उर्जेचं रुपांतर करता येत. जे आपल्या इंद्रियांना प्रत्यक्ष जाणवतं ते जडद्रव्य वस्तूतः ते जडद्रव्य नाही तर त्याचे स्वरूप उर्जेचे आहे.

या संदर्भात ‘मॅक्स फ़ॅक्स’ या शास्त्रज्ञाची (Quantum Theory) क्रांतिकारक मानली जाते. जडवस्तू (Matter) व उर्जा (Energy) यांचे परस्परांत परिवर्तन होऊ शकते. यापैकी जडवस्तू हे उर्जेचे स्थूल स्वरूप आहे. उर्जा ही अत्यंत सूक्ष्म व अनिर्वचनीय आहे. रेडीओ लहरी, दूरदर्शन लहरी व प्रकाशलहरी यांत मुलतःच कोणताही भेद नाही. या सर्व लहरींना Electro Magnetic Radiation असे सामुदायीक नाव आहे. अशाप्रकारे ती एकच शक्ती सृष्टीच्या विविध कोटीत कशी रुपांतरीत होते हे आपण पाहिलं.

ही शक्ती अमर्याद अनंत असल्यामुळे सृष्टीचा पूर्ण पसारा उभारूनही शेष म्हणजे शिल्लक राहते. ही शेष राहिलेली शक्ती म्हणजे मुलाधारातील कुंडलिनी शक्ती होय. ही जेव्हा उर्ध्वभिमुख होते तेव्हा उत्क्रांतीला सुरुवात होते. उत्क्रांती शिखरावरील मानवदेह हे आत्मसाक्षात्काराचे उत्कृष्ट साधन आहे. आत्मा नित्य शुद्ध मुक्त असल्यामुळे तो मूलतःच पूर्ण आहे. सूर्यामुळे उत्पन्न होणारे ढग ज्याप्रमाणे सूर्यालाच झाकतात व काही काळ आपल्याला सूर्यदर्शन होत नाही. त्याप्रमाणे शुद्ध चैत्यन्यरूप असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी ‘अहं’ ही स्फूर्ती होते व या स्फुर्तीज्ञानामुळे मनुष्य स्वतःला देह समजतो व काही काळ आपल्याला आत्मदर्शन होत नाही. परंतु ज्याप्रमाणे सोसाट्याचा वारा यावा आणि सर्व ढग उडून जावे त्याप्रमाणे सदगुरु कृपारूपी वारा वाहू लागला कि अज्ञानाचे ढग नाहीसे होतात व स्वयंप्रकाशरुपी आत्मा स्वतेजाने तळपू लागतो. त्यावेळेला मी देह म्हणजे जड आहे ही भावना नाहीसी होऊन मी ब्रम्ह म्हणजे चैतन्य आहे ही अनुभूती येते. ही अनुभूती प्राप्त होण्यासाठी कुंडलिनी शक्ती जागृत होण्याची आवश्यकता असते. कारण कुंडलिनी म्हणजे चैतन्यशक्ती.

ही शक्ती मूलाधारात वास करते. तिच्या अस्तित्वामुळेच सृष्टीचा आधार मूलाधार आहे. या आधाराच्या ठिकाणीच सर्व देवता वास करतात. या आधाराच्या पश्चिम भागात इडा पिंगळा व सुषुन्ना यांचा संगम होतो. ज्यावेळी गुरुकृपेने शक्ती जागृत होते. त्यावेळी मन व प्राण यांचा संयोग होऊन साधकाला दिव्य स्नान घडते. तेव्हा केवळ तेव्हाच तो साधक सर्व पापांतून मुक्त होतो. एरव्ही कुंभ मेळ्यात कितीही डुबक्या मारल्या तरी त्याला काही अर्थ नाही. ते फक्त भौतिक स्नान आहे. मन धुवायचं असेल तर इडा पिंगळा व सुषुन्नेच्या संगमातच स्नान घडलं पाहिजे आणि हे स्नान सदगुरुकृपेने कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर उपभोगाला भेटत. एरव्ही हे कदापीही शक्य नाही. मुलाधाराच्या पश्चिम भागामध्ये स्वयंभू लिंग असून तेथेच सुषुन्नेचा प्रवेशद्वार म्हणजे ब्रम्हद्वार आहे. हा मार्ग जेव्हा मोकळा होतो तेव्हा साधक सर्व प्रकारच्या संसार बंधनातून मोकळा होतो.

आपण मागे पाहिलेच आहे कि कुंडलिनी शक्ती ही द्विमुख शक्ती आहे. म्हणजेच कुंडलिनी शक्तीला दोन मुखे आहेत. ती एका मुखाने ब्रम्हद्वार अडवून निद्रा करते व दुसऱ्या मुखाने जागृत असते. त्यामुळेच जीवाला बह्यज्ञान किंवा चेतना प्राप्त होते परंतु फक्त चेतनेने चैतन्याची अनुभूती कशी येणार. चैतन्याची अनुभूती येण्यासाठी ही निद्रिस्त शक्ती जागृत होणे आवश्यक आहे. चितशक्ती ज्यावेळेला जागृत होते त्यावेळी शरीरातील प्रत्येक कणातून रक्तवाहिन्यातून चैतन्याचा प्रवाह प्रवाहित होतो. त्यामुळे शक्तीचे कार्य सुरु होऊन शरीराची जडता कमी होते व ही शक्ती क्रमाक्रमाने मनुष्याचे चैतन्यरूप प्रकट करते. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर त्याच्या देहाची जशी स्थिती असेल व मनाची जशी धारणा असेल त्याप्रमाणे शक्ती जागृत होऊन विकास होतो. अज्ञान जावून ज्ञान प्रकट होऊ लागते. कुंडलिनीच्या जागृतीमुळे हा विकास व ज्ञानप्राप्ती आपोआप घडून येते व शेवटी मनुष्याचा उद्धार होतो. ‘उत’ म्हणजे वरच्या दिशेने व ‘धार’ म्हणजे चैतन्याचा प्रवाह. कुंडलिनी ही चैतन्यमयी असल्यामुळे ती जागृत झाल्यावर ऊर्ध्वमुखाने म्हणजे वरच्या दिशेने चैतन्याचा प्रवाह प्रवाहित होऊन शेवटी संपूर्ण चैतन्याची प्रचीती येते. ही प्रचीती येण्यासाठी कुंडलिनी जागृती अत्यंत आवश्यकता आहे. किंबहुना कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याशिवाय ही अनुभूती येणे कदापीही शक्य नाही. सात्विकभाव जागृत होतात.

ही शक्ती दैवी ज्ञानाने युक्त असल्यामुळे प्रज्ञा जागृती, प्रतिभाशक्ती, कवित्व, ग्रंथनिर्मिती, असामान्य वक्तृत्व, नेतृत्व, शास्त्रामधील गूढ सिद्धांताची फोड, अतींद्रिय शक्ती जागृती, नवनवीन सिद्धांताची निर्मिती, प्रचंड आत्मविश्वास निडरपणा, कालबाह्य झालेल्या रुढी नियम तोडून सामाजिक विकासासाठी नवीन मूल्यांच्या निर्मिती इत्यादी गोष्टी आपोआप घडू लागतात. सरतेशेवटी मायेच्या यच्चयावत् बंधाचा पूर्ण निरास होऊन आत्मा स्वतेजाच्या प्रकाशाने चमकू लागतो. व्यक्ती स्वतःच शिवरूप होऊन जागृत कुंडली बनून ज्याप्रमाणे एका दिव्याने अनेक दिवे पेटवावे त्याप्रमाणे तो लोकांचा अज्ञानरूपी अंधकार दूर करून लक्ष लक्ष ज्ञानदीप प्रज्वलित करतो.

शंका व समाधान

वरील सर्व विवेचन वाचल्यानंतर कदाचित कुणी अशी शंका घेईल की आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी नावाची शक्ती जर अस्तित्वात आहे तर आतापर्यंत एकाही शरीरशास्त्रज्ञाला ती कशी दिसली नाही. आज विज्ञान एवढ प्रचंड प्रगत झालं आहे. कितीतरी प्रकारच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा फोटोग्राफी व एक्स-रे मशिन्स निघाल्या आहेत. मग तरी सुद्धा अजूनपर्यंत ह्या कुंडलिनीच दर्शन एकाही शरीर शास्त्रज्ञाला कसं झालं नाही. ज्या गोष्टी आधुनिक प्रगत विज्ञानाला माहित नाही त्या गोष्टी प्राचीन ऋषीमुनींनी कशा जाणल्या. खरोखर हे सत्य आहे कि थोतांड? कुंडलिनी शक्ती ही कपोलकल्पित गोष्ट तर नाही ना?

आपल्या सर्व शंका रास्त आहेत. बरोबर आहेत. आधुनिक विज्ञान प्रगत जरूर झालं आहे परंतु विज्ञानाला सुद्धा काही मर्यादा आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विज्ञान दृश्यावर प्रयोग करत आहे. विविध प्रयोगशाळा, विशिष्ट उपकरणे, अत्याधुनिक यंत्रे हि विज्ञानाची साधने आहेत. वैज्ञानिक ज्ञान हे सापेक्ष आहे. कारण ते शरीर मन बुद्धीच्या कक्षेत आकलन करता येत. अध्यात्मिक ज्ञान मात्र आपली इंद्रिये मन बुद्धी यांच्या कक्षेत आकलन करता येत नाही. ‘यतो वाच्यो निर्वतन्ते अप्राप्य मनसा सह:’ येथे वाचा खुंटीत होते. मन उन्मन होऊन बुद्धीची मर्यादा संपते.

अध्यात्म ज्ञान हे निरपेक्ष आहे. त्यामुळे ते विज्ञानाच्या कक्षेत येत नाही. आधुनिक विज्ञानाने हि गोष्ट मान्य केली आहे. भौतिक शास्त्रज्ञ भौतिक वस्तूचे पृथक्करण करून मानवी सुखात भर टाकत होते. तोपर्यंत सर्वकाही ठिक चाललं होत. परंतु ज्यावेळी ते प्राण, मन, बुद्धी, आत्मा ह्या चैत्यन्यशक्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहचले त्यावेळी त्यांची सृष्टी संशोधनाची आधुनिक साधने तेथे तोकडी पडू लागली आणि मग विज्ञानशास्त्रातले प्रकांड पंडित आईनस्टाईन, मिलीकन, एडिसन म्हणू लागले की आधुनिक विज्ञानाची सृष्टी संशोधनाची पद्धती तिच्या पलीकडे असणाऱ्या अदृश्य शक्तीला (Spiritual world) लागणे शक्य नाही. एन. वासुदेवन या विचारवंतानेही अणुमधील अधिष्टात्री देवता ही शास्त्रीय ज्ञानाच्या पलीकडे आहे अस म्हटलं आहे. पहा Modern Science & Self knowledge – Mountain Path July 1984. विज्ञानाच्या पलीकडे काही क्षेत्रे आहेत हे शास्त्रज्ञ नम्रपणे कबुल करू लागले आहेत. परंतु विज्ञानच न समजलेले काही शहाणे मात्र अध्यात्म व अध्यात्मिक साधना यांना मेंदूवर झालेला परिणाम संमोहन वगैरे नाव देवून खोट्या ठरवू पाहत असतात. असो, तांदळामध्ये नाही का खडे असतात. जग हे असेच आहे व ते असेच राहणार. आपण मात्र आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

प्रख्यात वैज्ञानिक एडिसन म्हणतो की कोणतीतरी अज्ञात अव्यक्त शक्ती कारणरूपाने कार्य करत आहे. आम्ही त्या तत्वाबद्दल त्या शक्तीबद्दल काही जाणत नाही. भौतिक जगाच्या पलीकडे काही अज्ञात अव्यक्त तत्वाशी सामना करावा लागतो हेही सत्य शास्त्रज्ञांनी आता कबुल केलं आहे. आपल्या सर्वांना मन आहे. अहो मन आहे म्हणून कॉलेजमध्ये आपण मानसशास्त्र शिकतो ना! आपल्याला फक्त मन आहे एवढंच नाही तर या मनाला काही रोग सुद्धा आहेत असं आपण मानतो म्हणून mental hospitals सुद्धा आहेत. परंतु मन कोठे आहे? मेंदू डोक्यात असल्यामुळे व त्याची शंभर टक्के खात्री असल्यामुळे मन मेंदूतच आहे. असा चुकीचा गैर समज आपला झाला आहे.

भौतिक शास्त्रज्ञांनी मेंदूच्या कार्याचे वर्णन केले असले तरी अमुक एक भाग म्हणजे मन असा उल्लेख कोठेही केला नाही. तसेच मेंदूलाच कोणी मन म्हणत नाही. मेंदू हा जड तत्वांचा बनला असल्यामुळे त्याला चैतन्याचे गुण नाहीत. Mental Hospital असले तरी कुणी मनावर शस्त्रक्रिया केल्याचे अगर मनाला इंजेक्शन मारल्याचे ऐकिवात नाही. कारण मन अदृश्य आहे. म्हणजे विज्ञानाच्या मर्यादित साधनांनी व उपकरणांनी त्याच अस्तित्व सिद्ध करता येत नाही. प्रत्येक क्षणाला ज्याच अस्तित्व आपण मान्य करतो ते मन जर विज्ञानाला दाखवता येत नाही तर मनाला चेतना देणारी शक्ती भगवती कुंडलिनी शक्ती ती विज्ञानाच्या मर्यादित उपकरणांनी कशी बरे दाखवता येईल. कुंडलिनी शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव न घेता तिच्या विषयी बोलणारे धर्माचार्य व विज्ञानवादी या दोघांमध्ये काहीही फरक नाही. कुंडलिनी शक्तीचा ज्यांना साक्षात्कार झाला आहे ते छातीठोकपणे सांगतात कुंडलिनी शक्ती, चैतन्यशक्ती ही आपल्या आत मध्ये विराजमान आहे. तिला जागृत करून मनुष्य चैतन्यरूप होऊ शकतो.

भारतीय संस्कृती व भारतीय तत्वज्ञानाची ओळख ज्यांनी संपूर्ण जगाला दिली ते विश्वविजेते स्वामी विवेकानंद राजयोग ग्रंथाच्या चौथ्या प्रकरणात असे म्हणतात की संपूर्ण ज्ञान व संपूर्ण चैतन्य यांची प्राप्ती करून घेण्याकरिता कुंडलिनी जागृत करणे हा एकच उपाय उपलब्ध आहे. सर्व सुखाची जननी प्राणशक्ती कुंडलिनी तुमच्या जवळच आहे. तिची आराधना करा तिला आळवा तिचे दुध तुम्हांस मिळाले तर अनंत काळापासून तुम्हांस लागलेली क्षुधा व तृष्णा तत्क्षणीच शांत होईल. विज्ञान या बद्दल अज्ञान आहे. व आपल अज्ञान विज्ञानाने कबूल केलं आहे. भावी काळात ही आनंदाची गोष्ट आहे. चला आपण विज्ञानातून अध्यात्माकडे वाटचाल करूया.

– प्रस्तुत लेख ओंकार महाराज लिखित ‘महायोग विज्ञान’ या ग्रंथातून घेतला आहे.

ॐकारक सोऽहमधारक

Blog placeholder

ॐकारक सोऽहमधारक । अद्वैतविलासक आदिनाथ ॥ १ ॥

शक्तिप्रपातक कुंडलिनी धारक । महायोग उपासक आदिनाथ ॥ २ ॥

विश्व विकासक विश्व विनाशक । नवनिर्माण कारक आदिनाथ ॥ ३ ॥

सुक्ष्मरुप धारक महा विस्तारक । ब्रम्हांड व्यापक आदिनाथ ॥ ४ ॥

चित् धारक चैतन्य कारक । चिद् विलासक ओंकार ॥ ५ ॥

   

ॐकारक सोऽहमधारक । अद्वैतविलासक आदिनाथ ॥ १ ॥

समस्त विश्व ब्रम्हांडाचे आदितत्व हे ॐ आहे. ॐ मधूनच समस्त विश्व ब्रम्हांडाची निर्मिती होत असते. गुरु हा ॐकारक असल्यामुळे समस्त विश्व ब्रम्हांडाचे सृजन करण्याची शक्ती गुरुमध्ये असते. परंतु गुरु हा फक्त ॐकारक नाही तर तो सोऽहं धारक सुद्धा आहे. त्यामुळे अज्ञानी असलेल्या जीवाला त्याच्या सत्य स्वरुपाची ओंकार स्वरुपाची जाणीव करून देण्यासाठी गुरु त्याला सोऽहं बोधाचा उपदेश करतात.

ज्या शक्तीने समस्त विश्व ब्रम्हांडाची निर्मिती केली आहे ती शक्ती तूच आहे. ‘तत्वमसी’ तो ओंकार तूच आहेस. ह्या समस्त विश्वब्रम्हांडामध्ये भरलेली उर्जा तूच आहेस. तू व्यक्ती नाहीस तू शक्ती आहेस, तू देह नाहीस तू ब्रम्ह आहेस, तू जीव नाहीस तू शिव आहेस याची जाणीव गुरु करून देतात. गुरूच्या या दिव्य ज्ञानाने शिष्य सोऽहं बोधावर आरूढ होतो. त्याला आपल्या मूळ स्वरुपाची म्हणजे ओंकार स्वरुपाची प्राप्ती होते. हा अद्वैतविलास फक्त गुरुकृपेनेच अनुभवाला येत असल्यामुळे गुरु हा अद्वैतविलासक सुद्धा आहे.

अद्वैत म्हणजे एकच, दोन नाही. जीव आणि शिव भिन्न नाही. व्यक्ती आणि शक्ती भिन्न नाही. देह आणि ब्रम्ह भिन्न नाही. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर पदार्थ (matter) आणि उर्जा (energy) हे भिन्न नाही. देव आणि भक्त भिन्न नाही. ही दिव्य अनुभूती ‘याची देही याची डोळा’ जो अनुभवाला देतो तो गुरु. म्हणून ओंकारक आणि सोहमधारक असलेल्या हे आदिनाथा तुमचा जयजयकार असो.

 शक्तिप्रपातक कुंडलिनी धारक । महायोग उपासक आदिनाथ ॥ २ ॥

समस्त विश्व ब्रम्हांडाचे सृजन करून जी शक्ती शेष म्हणजे शिल्लक उरलेली असते ती शक्ती अणुस्वरूप धारण करण्यासाठी चक्राकार गती धारण करते. तिच्या या चक्राकार गतीमधून तिला कुंडलाकार प्राप्त होतो. म्हणून तिला कुंडलिनी म्हणतात. कुंडलिनी शक्ती म्हणजे चितशक्ती. अणूच्या गर्भापासून ते आकाशगंगेपर्यंत सर्वत्र याच शक्तीचा विलास सुरु आहे. ही चित शक्ती जो धारण करतो तो महाशक्तिशाली बनतो. भगवान आदिनाथ हे महायोग उपासक असल्यामुळे त्यांनी कुंडलिनी शक्ती धारण केली आहे. त्यामुळे शक्तीप्रपात म्हणजे शक्तिपात करून ते शिष्याला त्याच्या आत्मस्वरूपाची ओंकार स्वरुपाची अनुभूती देवू शकतात.

विश्वविकासक विश्वविनाशक । नवनिर्माणकारक आदिनाथ ॥ ३ ॥

शक्ती उर्जा ही नेहमी अस्तित्व व अनास्तित्व या माध्यमातून कार्य करत असते. जी शक्ती पर्वत निर्माण करते त्याच शक्तीच्या माध्यमातून दरी निर्माण होते. ज्या शक्तीच्या माध्यमातून सृष्टीची निर्मिती होते त्याच शक्तीच्या माध्यमातून सृष्टीचा विनाश होत असतो. जर विनाश झालाच नाही तर नवनिर्माण कसे संभवणार? म्हणून सृष्टीच्या संतुलनासाठी जेवढ सृजन महत्वाचे आहे तेवढाच संहार सुद्धा महत्वाचा आहे. सृष्टीची निर्मिती जेवढी महत्वाची आहे सृष्टीचा विनाश सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.

या समस्त विश्वब्रम्हांडामध्ये ओतप्रोत भरलेली वैश्विक उर्जा म्हणजे ॐ होय. ही वैश्विक उर्जा ज्यावेळी सोऽहं अवस्थेला प्राप्त होते त्यावेळी तिच्यामध्ये प्रचंड गती निर्माण होते. सोऽहं अवस्था म्हणजे ‘स्पंदन अवस्था’ होय. हि शक्ती सोऽहं अवस्थेला म्हणजे स्पंदन अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर तिच्यामधून निर्माण झालेल्या प्रचंड गतीमधून जी शक्ती निर्माण होते ती शक्ती म्हणजे कुंडलिनी होय. ज्यावेळी हि शक्ती प्रचंड वेगाने ब्रम्हांडामध्ये झेप घेते त्यावेळी संपूर्ण सृष्टी कंपायमान होते. समुद्राच्या लाटा प्रचंड वेगाने रोरावत आकाशामध्ये झेप घेतात. विजांचा कडकडाट सुरु होतो ढगांचा गडगडाट सुरु होतो. पंचमहाभूते आकाशामध्ये विलीन पावतात. समस्त सृष्टीचा विनाश करून शक्ती ब्रम्हांडामध्ये आपल्या मूळ स्वरूपामध्ये स्पंदन विहीन अवस्थेमध्ये ओंकारामध्ये विलीन पावते. अशाप्रकारे ब्रम्हांडामध्ये हि शक्ती कशी कार्य करते ते आपण पाहिलं. आता आपण पिंडाचा विचार करूया.

ॐकार स्वरूप असलेले गुरु ज्यावेळी शिष्यावर सोऽहं भावाने कृपा करतात त्यावेळी शक्ति पाताच्या आघाताने निद्रिस्त असलेली आदिशक्ती कुंडलिनी जागृत होते. जागृत झाल्यानंतर प्रचंड वेगाने ती ब्रह्मरंध्राकडे झेप घेवू लागते. त्यावेळी शक्तीच्या प्रचंड आवेगाने साधकाचे शरीर थरथर कापायला सुरुवात होते. शक्ती ज्यावेळी आज्ञाचक्रामध्ये वेश करते त्यावेळी तेथे ज्योत चमकू लागते. चक्रे उमटायला लागतात. दशनाद सुरु होतो. दगडासारखे कठोर असलेल अंतःकरण शक्तिच्या प्रचंड आघाताने मेणासारखे मऊ होते. कंठ सदगदित होतो. डोळ्यामधून अश्रूधारा वाहायला सुरुवात होते. जीवभावाचा नाश होतो व व्यक्ती स्वतः शिवस्वरूप बनून जातो. त्याला आपल्या मूळ स्वरुपाची ओंकारस्वरुपाची अनुभूती येते. थोडक्यात सृष्टीच्या नवनिर्माणासाठी व जीवाच्या उत्क्रांतीसाठी विनाश हा आवश्यक आहे. जोपर्यंत विनाश होत नाही तो पर्यंत नवनिर्माण संभवणार नाही. म्हणून भगवान आदिनाथ हे विश्व विकासक आहेत परंतु त्याचबरोबर ते विश्वविनाशक सुद्धा आहेत. कारण विनाशानेच नवनिर्माण संभव होणार आहे.

 सुक्ष्मरुपधारक महाविस्तारक । ब्रम्हांडव्यापक आदिनाथ ॥ ४ ॥

उर्जा हि अत्यंत सूक्ष्म आहे. मग हि उर्जा मानवी शरीरामध्ये कार्य करणारी असो वा ब्रम्हांडामध्ये कार्य करणारी असो. मानवी शरीरामध्ये आत्मा असतो. आत्मा म्हणजे आंतरिक उर्जा. हि आंतरिक उर्जा एवढी सूक्ष्म आहे की ज्यावेळी ती शरीरामध्ये प्रवेश करते त्यावेळी ती कोणालाही दिसत नाही. एवढेच नव्हे तर ज्यावेळी ती शरीरामधून बाहेर पडते त्यावेळीसुद्धा ती कुणाला दिसत नाही. मनुष्याचे सत्यस्वरूप हे फक्त शरीर नसून शरीरामध्ये असलेली आंतरिक उर्जा हेच मनुष्याचे सत्यस्वरूप आहे.

ॐकार स्वरूप असलेल्या सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर आपण महायोग विज्ञानाचे प्रयोग सुरु केले तर आपल्याला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराजांनी आपल्या सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली महायोग विज्ञानाचे प्रयोग सुरु केले. सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या मध्ये अरूप असणाऱ्या परमात्म्याला रुपाला आणले. तुकाराम महाराज म्हणतात, ‘ऊर्ध्वमुखे आळविला सोऽहं शब्दाचा नाद’. तुकाराम महाराजांनी उर्ध्वमुखाने सोऽहं शब्दाचा नाद आळवून आपल्या मध्ये अरूप असणाऱ्या परमात्म्याला रुपाला आणले.

अरूप परमात्मा ज्यावेळेला रुपाला येतो त्यावेळी आपण ज्या देशामध्ये राहतो तो देश आपण ज्या काळामध्ये राहतो तो काळ व विश्व नावाची एक वस्तू हा भेद मावळून जातो. मन उन्मन होतं . मन उन्मन झाल्यावर आपला आत्मा (आंतरिक उर्जा) परमात्म्याशी (वैश्विक ऊर्जेशी) एकरूप झाल्याचा अनुभव येतो. हीच अणुपेक्षा सूक्ष्म व आकाशापेक्षा व्यापक असणारी अनुभूती होय. तुकाराम महाराजांना ज्यावेळी हि अद्वैत अनुभूती प्राप्त झाली त्यावेळी त्यांनी आपल्या अभंग म्हणजे कधीही भंग न पावणाऱ्या वाणीमधून आपला अनुभव जगासमोर मांडला. तुकाराम महाराज म्हणतात,

अणु रेणू या थोकडा । तुका आकाशा एवढा ॥

आत्मा (आंतरिक उर्जा) ही अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. हि अणुपेक्षाही सूक्ष्म असणारी आंतरिक उर्जा ज्यावेळी गुरुकृपेने परमात्म्याशी (वैश्विक ऊर्जेशी) एकरूप होते त्यावेळी हि आंतरिक उर्जा अणुपेक्षाही सूक्ष्म व आकाशापेक्षा हि व्यापक असल्याची अनुभूती येते. वास्तविक आत्मा (आंतरिक उर्जा ) सिमित नसून सिमातीत आहे, मर्यादित नसून अमर्याद आहे. ती तेजःपुंज, स्वयंप्रकाशित, ज्ञानघन व आनंदरूप आहे. तुकाराम महाराजांनी अथक प्रयास व प्रचंड साधना (प्रयोग ) यांच्या माध्यमातून आपल्या सत्यस्वरूपाची, आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली. ओंकार स्वरूप असणारे सदगुरू आपल्या शिष्याला हि दिव्य अनुभूती प्राप्त करून देवू शकतात. कारण ते स्वतःच सूक्ष्मरूप धारक, महाविस्तारक व ब्रम्हांडव्यापक असतात. ते स्वतः तर तसे असतातच परंतु जे कोणी त्यांना शरण येतात त्यांनासुद्धा ते त्यांच्या सारखेच करतात.

 चितधारक चैतन्यकारक । चिद्विलासक ओंकार ॥ ५ ॥

प्रकाश संशोधनाच्या प्रक्रियेत विश्वाची निर्मिती हि शून्यामधून झाली नसून विश्वाच्या मुळाशी एक अखंड, अनंत उर्जा कार्य करत आहे हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. परंतु या उर्जेचे अंतिम स्वरूप काय आहे याबाबत विज्ञान अज्ञान आहे. उदा. विद्युत (Electricity) हिच्यामध्ये प्रचंड उर्जा आहे . परंतु हि उर्जा फक्त चितधारक आहे म्हणजे प्रकाशरूप आहे. परंतु ती चैतन्यकारक नाही. परमात्मा (वैश्विक उर्जा) हि चितधारक म्हणजे प्रकाशरूप तर आहेच परंतु ती त्याचबरोबर चैतन्यकारक सुद्धा आहे. प्रकाश हा जड आहे त्याच्यामध्ये जाणीव नाही. फक्त चैतन्य हे स्वयंगतिक आहे कारण त्याच्यामध्ये जाणीव आहे, ते ज्ञानघन आहे. हे विश्व जड नाही या विश्वाच्या मुळाशी उर्जा आहे ती उर्जा फक्त चितधारक म्हणजे प्रकाशरूप नसून चैतन्यकारक म्हणजे ज्ञानरूप सुद्धा आहे.

आधुनिक विज्ञान ज्या पायावर उभे आहे त्या आधुनिक विज्ञानाचा पायाच आज कॉनटम मेक्यानिक्सने उखडून टाकला आहे. हायजेनबर्गच्या अनिश्चिततावाद सिद्धांताने विज्ञानामधील निश्चितता पार धुळीला मिळवून टाकली आहे. इलेक्ट्रोनला मन आहे अशी भाषा काही शास्त्रज्ञ बोलू लागले व त्यातून ‘नॉन लोकल कनेक्शन’ ची कल्पना पुढे आली. एका ठिकाणच्या इलेक्ट्रोनवर दुसऱ्या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रोनचा परिणाम होऊ शकतो हि ती कल्पना. हि ‘नॉन लोकल कनेक्शन’ ची कल्पना खोडून टाकण्यासाठी ‘आईनस्टाइन, पोडोलोस्की व रोझोन’ या तीन शास्त्रज्ञांनी १९३५ साली एक प्रयोग सुचविला तो ‘ईपीआर प्रयोग’ म्हणून पुढे खूप गाजला.

१९८२ साली ‘अलन आस्पेक्ट’ या फ्रेंच शास्त्रज्ञाने ‘ईपीआर प्रयोग’ करून बघितला. एका इलेक्ट्रोनची फिरण्याची दिशा हि लाखो मैल दूर असलेल्या इलेक्ट्रोनच्या फिरण्याच्या दिशेने क्षणात बदलली आणि शास्त्रज्ञांची मती गुंग झाली. एकदा एकत्र असलेले इलेक्ट्रोन दोन वेगवेगळ्या दिशांना गेल्या नंतर लाखो मैल दूर अंतरावर असताना एका इलेक्ट्रोनची फिरण्याची दिशा बदलल्यानंतर चक्क दुसऱ्या इलेक्ट्रोनच्या फिरण्याच्या दिशेमध्ये बदल झाला होता. हे शक्यच नव्हतं कारण प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने त्यांनी एकमेकांशी संवाद साधला कसा? हे इलेक्ट्रोन एकमेकांशी संवाद साधतात तरी कसा? हे शक्यच नव्हतं.

परंतु तसं होताना दिसत होतं. इलेक्ट्रोनला मन आहे का? ते जिवंत नाहीत कशावरून? असे प्रश्न निर्माण झाले. जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाइन कॉनटम मेक्यानिक्स च्या समोरची लढाई हरला. ‘ईपीआर प्रयोग’ सिद्ध झाला. ‘नॉन लोकल कनेक्शनचं’ चैतन्यशक्तीचं अस्तित्व सिद्ध झालं. हे विश्व म्हणजे जडद्रव्याचा महासागर आहे असे म्हणणाऱ्या, ईश्वर मेला आहे (God is Dead ) असा निर्वाळा देणाऱ्या, आधुनिक विज्ञानाच्या पायाखालची जमीन सरकू लागली. मन, बुद्धी, आत्मा या खुळचट कल्पना आहेत. आध्यात्मिक अनुभूती म्हणजे ढोंग आहे, मेंदूवर झालेला विपरीत परिणाम आहे असे म्हणणाऱ्या विज्ञानवाद्यांची तोंडे आता मात्र पाहण्यासारखी झाली होती.

आधुनिक विज्ञान जेथे हात टेकते तेथून अध्यात्म सुरु होते. अध्यात्म हे शास्त्र आहे. महायोग हे विज्ञान आहे. हजारो ऋषीमुनींनी, साधू संतानी साधना करून (प्रयोग करून) ते सिद्ध केले आहे. वैश्विक उर्जा परमात्मा हा फक्त चित्तधारक म्हणजे प्रकाशरूप नसून तो चैतन्यधारक म्हणजे स्वयंगतिक व ज्ञानघन आहे हे अध्यात्माचे म्हणणे कॉनटम मेक्यानिक्स ने सिद्ध केले आहे. हे विश्व जड नाही, या विश्वामध्ये जड नावाची वस्तूच अस्तित्वात नाही. हे विश्व चैतन्याचा सागर आहे. अणुच्या गर्भापासून आकाशगंगेपर्यंत सर्वत्र चैतन्याचेच अस्तित्व आहे.

हे विश्व म्हणजे चैतन्याचा विलास आहे. हा विलास आहे चिद आणि चैतन्याचा, हा विलास आहे प्रकृती आणि पुरुषाचा, हा विलास आहे शिव आणि शक्तीचा, हा विलास आहे सृजन आणि संहाराचा, हा विलास आहे विकास व विनाशाचा, हा विलास आहे आत्मा व परमात्म्याचा, हा विलास आहे विज्ञान व अध्यात्माचा. समस्त विश्वब्रम्हांडामध्ये शुभ्र धवल रंगाने, पांडूरऽरंगाने विराजमान असणाऱ्या अविनाशी उर्जेचा, माझ्या पांडुरंगाचा हा विलास आहे. माझ्या ज्ञानराज माऊलीच्या ज्ञानेश्वरी मधून साकार झालेल्या शिवशक्तीचा हा विलास आहे, हा विश्व चैतन्याचा विलास आहे. या विश्वाच्या बाहेर परमात्मा नाही.

म्हणौनि जगापरोते । सारुनी पाहिजे माते । तैसा नव्हे उखिते । सकटची मी ॥ ज्ञानेश्वरी

या जगाच्या पलीकडे, या विश्वाच्या पलीकडे परमात्मा कुठे हि नाही. भगवे वस्त्र धारण करून, लंगोटी लावून, संसाराचा त्याग करून कुठे निघालास त्याला शोधायला? हे जग माया नाही, हे विश्व माया नाही, हे विश्व त्या चैतन्याचा विलास आहे. अरे वेड्या ! जग आणि जगदीश वेगळे नाही, जीव आणि शिव वेगळे नाही, आत्मा आणि परमात्मा वेगळे नाही, ज्ञान आणि विज्ञान वेगळे नाही, योग आणि भक्ति वेगळी नाही, चिद आणि चैतन्य वेगळे नाही, ॐ आणि सोऽहं वेगळे नाही. चितधारक म्हणजे प्रकाशरूप असणारा, चैतन्यकारक म्हणजे ज्ञानघन, षडगुणऐश्वर्य संपन्न असणारा चिद्विलासक ओंकार तूच आहेस.

‘तत्वमसी, तत्वमसी, तत्वमसी ओंकारा’

– प्रस्तुत लेख ओंकार महाराज लिखित ‘ओंकार गाथा’ मधील गुरु स्तवन या प्रकरणातून घेतला आहे.