हे जग लेच्यापेच्या लोकांचे नाही. गीता सांगते जीवन संघर्षमय आहे. तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला जर जगायचं असेल, स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. कृष्ण अर्जुनाला सांगतो, अर्जुना तुला हा दुबळेपणा शोभत नाही तू पुरुष आहेस. ऊठ आणि पुरुषार्थ कर. महायोग विज्ञानाचा मार्ग हा पुरुषार्थाचा मार्ग आहे. देव, दैव, नशीब यांच्या नावाने खडे फोडत बसण्यापेक्षा स्वतःमधील अंतर शक्ती जागृत करा. महायोग विज्ञानाचे प्रयोग करून स्वतःला एवढा शक्तीमान बनवा की स्वतः ईश्वराने येऊन तुम्हाला विचारल पाहिजे की बेटा तुला काय पाहिजे.
या जगामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता, प्राप्त करून घेऊ शकता. तुम्हाला अशक्य काही नाही Everything Is Possible. सर्व काही शक्य आहे. फक्त तुम्हाला जे पाहिजे त्याच्या लायक तुम्ही स्वतःला बनवलं पाहिजे. तुमच्यामध्ये सुप्त असणारी शक्ती, सुप्त असणारे ज्ञान व सुप्त असणारा आत्मविश्वास तुम्ही जागृत केला पाहिजे. आपल्यामध्ये असणारे सुप्त ज्ञान, सुप्त शक्ती व आत्मविश्वास जागृत करण्यासाठी महायोग विज्ञान जाणून घेण आवश्यक आहे.
महायोग म्हणजे सर्व योगा मधील श्रेष्ठ असा योग. या पृथ्वीवर या योगापेक्षा दुसरा श्रेष्ठ योग नाही. कारण या एकाच योगात इतर सर्व योगांचा व उपासनांचा समावेश झाला आहे. एवढेच नव्हे तर इतर कोणत्याही साधनात कुंडलिनी शक्ती जागृत होऊन अनुभव येण्यास वेळ जातो. महायोगामुळे मात्र कुंडलीनी शक्ती जागृतीचे फळ तात्काळ मिळून नाना प्रकारचे दिव्य अनुभव साधकाला येऊन ब्रम्हप्राप्ती अगदी सहज होते.
या महायोगाचा महिमा अत्यंत अदभूत आहे. इतर अनेक योग योगी लोकांनी सांगीतले आहेत. मात्र महायोग हा स्वतः भगवान आदिनाथांनी सांगितला आहे. त्याचे प्रवर्तक स्वतः महायोगी भगवान आदिनाथ आहेत. म्हणून या महायोगाशी इतर कोणत्याही योगाबरोबर तुलना होऊ शकत नाही. या भूतलावर जितके योग प्रचलित आहेत त्या सर्व योगात भगवान शंकरांकडून प्रवर्तित झालेला महायोग हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग आहे.
महायोगा व्यतिरिक्त इतर जे अनेक योग आहेत. त्याने आत्मसिद्धी प्राप्त होत नाही. इतर रिद्धी-सिद्धी प्राप्त होतात व साधकाच्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो व साधक आत्मसाक्षात्कारा पासून भ्रष्ट होतो. त्यामुळे इतर योगमार्गाने मनुष्यास ईश्वरी साक्षात्कार होत नाही. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे योगी चांगदेव महाराज. चांगदेवाने हठयोगाच्या माध्यमातून अनेक रिद्धी-सिद्धी प्राप्त केल्या होत्या. असे म्हणतात की, मेलेले मुडदे सुद्धा चांगदेवाच्या स्पर्शाने जिवंत व्हायचे तर अशा चांगदेवाला सुद्धा आत्मसाक्षात्कारा साठी ज्ञानेश्वरांना शरण जावं लागलं कारण ज्ञानेश्वर स्वतः महायोगाचे उपासक होते व हा महायोग त्यांना आदिगुरु शंकरा पासून प्राप्त झाला होता. इतर योगाची साधना करणारे योगी ईश्वरी साक्षात्कार प्राप्त करून घेऊ शकत नाही. तर केवळ महायोगानेच सर्व जीव ईश्वरी साक्षात्कार व आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेऊ शकतात. याबाबत तिळमात्र शंका नाही. महायोग हा सिध्दमार्ग आहे. सिध्दमार्ग म्हणजे सिध्द असा मार्ग. राजमार्गा सारखा तयार रस्ता. राजमार्गा वरून चालताना माणसाला कष्ट पडत नाही, त्रास होत नाही व तो मुक्कामाला नक्की सुखरूप पोहोचतो. एकदा राजमार्ग भेटल्या नंतर आडवे तिडवे फाटे फुटत नाहीत. मार्ग चुकण्याची भीती नाहीसी होते. या मार्गाने विनासायास योगाची प्राप्ती होते. योग प्राप्त झाला की शक्ती ची प्राप्ती होते, शक्तीतून भक्ती प्रगट होते, भक्ती मधून आत्म विस्तार होतो व मनुष्याचा उद्धार होतो.
हा महायोग ज्यावेळी गुरुकृपा होते त्यावेळी दृष्टीस पडतो. हा अतिशय गुह्य असा मार्ग आहे परंतु गुरुकृपा झाल्यावर अतिशय गुह्य असणारा हा मार्ग मात्र आपल्या दृष्टीपथास येतो. या मार्गाने साधक चालू लागला की तहान भूक विसरून जातो. त्याला रात्र व दिवस यांची आठवण राहत नाही. साधकाला रात्रंदिवस साधना करावी वाटते. एकदा का डोळे बंद केले की पुन्हा उघडण्याची इच्छा राहत नाही. गुळाला मुंगळा जसा चिकटतो तसाच साधक साधनेला चिकटून बसतो. त्याला त्यामध्ये एवढी गोडी निर्माण होते की इतर भौतिक सुख या आत्मसुखा पुढे त्याला तुच्छ वाटू लागतात.
सदगुरू असा सिद्ध योग साधकाला देतात. साधकाचे काम एवढेच की त्याने डोळे मिटून स्वस्थ बसायचे व प्राणायामाच्या माध्यमातून अक्षरब्रम्हाचा मनात जप करायचा बस्स! बाकी काही करायचे नाही जे काही होईल ते फक्त साक्षी होऊन पहायचे. साधक अशा प्रकारे पूर्ण शरण आला की सदगुरू कृपेने मुलाधारात निवास करणाऱ्या कुंडलीनी शक्तीचे संचलन सुरु होते. त्यामुळे हठयोग, मंत्रयोग, लययोग इत्यादी सर्व योग स्वाभाविक रीतीने आपोआप साधू लागतात. हे योग मुद्दाम स्वतंत्र रीतीने करण्याची गरज लागत नाही. आसन, मुद्रा, प्राणायाम, जप, अनुष्ठान, ध्यान-धारणा इत्यादी कोणतीही क्रिया स्वतःहून करण्याचे कारण उरत नाही. सर्व प्रकारच्या योगांचा व उपासनांचा अंतिम हेतू हा कुंडलीनी शक्ती जागृत करणे हा असतो. हा हेतू गुरूच्या कृपेने सहज साध्य होतो व तत्काळ कुंडलीनी जागृतीची अनुभूती येण्यास सुरुवात होते. महायोगाला सहज योग असेही म्हटले जाते. सहजयोग म्हणजे सहज होणारा योग. या योगात अवघड असे काही नाही. जे काही या महायोगात आहे. ते सर्व सोपे, साधे, सरळ व स्वाभाविक असे आहे. या महायोगात अस्वाभाविक असे काहीही नाही. मुद्दाम बलपूर्वक एकही गोष्ट या योगात करावी लागत नाही. महायोगामध्ये साधकाला कोणत्याही आपत्तीची शंका नसते.
शक्ती जागृत झाली की सर्व शरीर थरथर कापणे, उड्या मारणे, हसणे, रडणे, घाम येणे, रोमांच उभे राहणे, मन प्रसन्न होणे, आनंदित होणे, निरनिराळ्या तऱ्हेची आसने, बंध, मुद्रा, प्राणायम होणे इत्यादी क्रिया आपोआप होऊ लागतात व कुंडलीनी शक्ती जागृत होते आणि मनुष्य अखेर सिध्द होतो. त्याला अशक्य असं काही राहत नाही. जीवनामध्ये जर यशस्वी, शक्तिमान, एैश्वर्यवान व्हाव असं वाटत असेल तर महायोग विज्ञानाचे प्रयोग करा.
– प्रस्तुत लेख गुरुराज ओंकार महाराज लिखित ‘महायोग विज्ञान’ या ग्रंथातून घेतला आहे.
Omkar Mission Omkar Meditation Center, Shani Mandir, Manpada Road, Dombivali East 421204 info@omkarmeditation.com
© 2015 All Rights Reserved. | Privacy Policy | Website Hosted & Managed by Supervision Host