समस्त विश्व ब्रम्हांडाचे आदितत्व हे ॐ आहे. ॐ मधूनच समस्त विश्व ब्रम्हांडाची निर्मिती होत असते. गुरु हा ॐकारक असल्यामुळे समस्त विश्व ब्रम्हांडाचे सृजन करण्याची शक्ती गुरुमध्ये असते. परंतु गुरु हा फक्त ॐकारक नाही तर तो सोऽहं धारक सुद्धा आहे. त्यामुळे अज्ञानी असलेल्या जीवाला त्याच्या सत्य स्वरुपाची ओंकार स्वरुपाची जाणीव करून देण्यासाठी गुरु त्याला सोऽहं बोधाचा उपदेश करतात.
ज्या शक्तीने समस्त विश्व ब्रम्हांडाची निर्मिती केली आहे ती शक्ती तूच आहे. ‘तत्वमसी’ तो ओंकार तूच आहेस. ह्या समस्त विश्वब्रम्हांडामध्ये भरलेली उर्जा तूच आहेस. तू व्यक्ती नाहीस तू शक्ती आहेस, तू देह नाहीस तू ब्रम्ह आहेस, तू जीव नाहीस तू शिव आहेस याची जाणीव गुरु करून देतात. गुरूच्या या दिव्य ज्ञानाने शिष्य सोऽहं बोधावर आरूढ होतो. त्याला आपल्या मूळ स्वरुपाची म्हणजे ओंकार स्वरुपाची प्राप्ती होते. हा अद्वैतविलास फक्त गुरुकृपेनेच अनुभवाला येत असल्यामुळे गुरु हा अद्वैतविलासक सुद्धा आहे.
अद्वैत म्हणजे एकच, दोन नाही. जीव आणि शिव भिन्न नाही. व्यक्ती आणि शक्ती भिन्न नाही. देह आणि ब्रम्ह भिन्न नाही. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर पदार्थ (matter) आणि उर्जा (energy) हे भिन्न नाही. देव आणि भक्त भिन्न नाही. ही दिव्य अनुभूती ‘याची देही याची डोळा’ जो अनुभवाला देतो तो गुरु. म्हणून ओंकारक आणि सोहमधारक असलेल्या हे आदिनाथा तुमचा जयजयकार असो.
समस्त विश्व ब्रम्हांडाचे सृजन करून जी शक्ती शेष म्हणजे शिल्लक उरलेली असते ती शक्ती अणुस्वरूप धारण करण्यासाठी चक्राकार गती धारण करते. तिच्या या चक्राकार गतीमधून तिला कुंडलाकार प्राप्त होतो. म्हणून तिला कुंडलिनी म्हणतात. कुंडलिनी शक्ती म्हणजे चितशक्ती. अणूच्या गर्भापासून ते आकाशगंगेपर्यंत सर्वत्र याच शक्तीचा विलास सुरु आहे. ही चित शक्ती जो धारण करतो तो महाशक्तिशाली बनतो. भगवान आदिनाथ हे महायोग उपासक असल्यामुळे त्यांनी कुंडलिनी शक्ती धारण केली आहे. त्यामुळे शक्तीप्रपात म्हणजे शक्तिपात करून ते शिष्याला त्याच्या आत्मस्वरूपाची ओंकार स्वरुपाची अनुभूती देवू शकतात.
शक्ती उर्जा ही नेहमी अस्तित्व व अनास्तित्व या माध्यमातून कार्य करत असते. जी शक्ती पर्वत निर्माण करते त्याच शक्तीच्या माध्यमातून दरी निर्माण होते. ज्या शक्तीच्या माध्यमातून सृष्टीची निर्मिती होते त्याच शक्तीच्या माध्यमातून सृष्टीचा विनाश होत असतो. जर विनाश झालाच नाही तर नवनिर्माण कसे संभवणार? म्हणून सृष्टीच्या संतुलनासाठी जेवढ सृजन महत्वाचे आहे तेवढाच संहार सुद्धा महत्वाचा आहे. सृष्टीची निर्मिती जेवढी महत्वाची आहे सृष्टीचा विनाश सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.
या समस्त विश्वब्रम्हांडामध्ये ओतप्रोत भरलेली वैश्विक उर्जा म्हणजे ॐ होय. ही वैश्विक उर्जा ज्यावेळी सोऽहं अवस्थेला प्राप्त होते त्यावेळी तिच्यामध्ये प्रचंड गती निर्माण होते. सोऽहं अवस्था म्हणजे ‘स्पंदन अवस्था’ होय. हि शक्ती सोऽहं अवस्थेला म्हणजे स्पंदन अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर तिच्यामधून निर्माण झालेल्या प्रचंड गतीमधून जी शक्ती निर्माण होते ती शक्ती म्हणजे कुंडलिनी होय. ज्यावेळी हि शक्ती प्रचंड वेगाने ब्रम्हांडामध्ये झेप घेते त्यावेळी संपूर्ण सृष्टी कंपायमान होते. समुद्राच्या लाटा प्रचंड वेगाने रोरावत आकाशामध्ये झेप घेतात. विजांचा कडकडाट सुरु होतो ढगांचा गडगडाट सुरु होतो. पंचमहाभूते आकाशामध्ये विलीन पावतात. समस्त सृष्टीचा विनाश करून शक्ती ब्रम्हांडामध्ये आपल्या मूळ स्वरूपामध्ये स्पंदन विहीन अवस्थेमध्ये ओंकारामध्ये विलीन पावते. अशाप्रकारे ब्रम्हांडामध्ये हि शक्ती कशी कार्य करते ते आपण पाहिलं. आता आपण पिंडाचा विचार करूया.
ॐकार स्वरूप असलेले गुरु ज्यावेळी शिष्यावर सोऽहं भावाने कृपा करतात त्यावेळी शक्ति पाताच्या आघाताने निद्रिस्त असलेली आदिशक्ती कुंडलिनी जागृत होते. जागृत झाल्यानंतर प्रचंड वेगाने ती ब्रह्मरंध्राकडे झेप घेवू लागते. त्यावेळी शक्तीच्या प्रचंड आवेगाने साधकाचे शरीर थरथर कापायला सुरुवात होते. शक्ती ज्यावेळी आज्ञाचक्रामध्ये वेश करते त्यावेळी तेथे ज्योत चमकू लागते. चक्रे उमटायला लागतात. दशनाद सुरु होतो. दगडासारखे कठोर असलेल अंतःकरण शक्तिच्या प्रचंड आघाताने मेणासारखे मऊ होते. कंठ सदगदित होतो. डोळ्यामधून अश्रूधारा वाहायला सुरुवात होते. जीवभावाचा नाश होतो व व्यक्ती स्वतः शिवस्वरूप बनून जातो. त्याला आपल्या मूळ स्वरुपाची ओंकारस्वरुपाची अनुभूती येते. थोडक्यात सृष्टीच्या नवनिर्माणासाठी व जीवाच्या उत्क्रांतीसाठी विनाश हा आवश्यक आहे. जोपर्यंत विनाश होत नाही तो पर्यंत नवनिर्माण संभवणार नाही. म्हणून भगवान आदिनाथ हे विश्व विकासक आहेत परंतु त्याचबरोबर ते विश्वविनाशक सुद्धा आहेत. कारण विनाशानेच नवनिर्माण संभव होणार आहे.
उर्जा हि अत्यंत सूक्ष्म आहे. मग हि उर्जा मानवी शरीरामध्ये कार्य करणारी असो वा ब्रम्हांडामध्ये कार्य करणारी असो. मानवी शरीरामध्ये आत्मा असतो. आत्मा म्हणजे आंतरिक उर्जा. हि आंतरिक उर्जा एवढी सूक्ष्म आहे की ज्यावेळी ती शरीरामध्ये प्रवेश करते त्यावेळी ती कोणालाही दिसत नाही. एवढेच नव्हे तर ज्यावेळी ती शरीरामधून बाहेर पडते त्यावेळीसुद्धा ती कुणाला दिसत नाही. मनुष्याचे सत्यस्वरूप हे फक्त शरीर नसून शरीरामध्ये असलेली आंतरिक उर्जा हेच मनुष्याचे सत्यस्वरूप आहे.
ॐकार स्वरूप असलेल्या सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर आपण महायोग विज्ञानाचे प्रयोग सुरु केले तर आपल्याला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराजांनी आपल्या सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली महायोग विज्ञानाचे प्रयोग सुरु केले. सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या मध्ये अरूप असणाऱ्या परमात्म्याला रुपाला आणले. तुकाराम महाराज म्हणतात, ‘ऊर्ध्वमुखे आळविला सोऽहं शब्दाचा नाद’. तुकाराम महाराजांनी उर्ध्वमुखाने सोऽहं शब्दाचा नाद आळवून आपल्या मध्ये अरूप असणाऱ्या परमात्म्याला रुपाला आणले.
अरूप परमात्मा ज्यावेळेला रुपाला येतो त्यावेळी आपण ज्या देशामध्ये राहतो तो देश आपण ज्या काळामध्ये राहतो तो काळ व विश्व नावाची एक वस्तू हा भेद मावळून जातो. मन उन्मन होतं . मन उन्मन झाल्यावर आपला आत्मा (आंतरिक उर्जा) परमात्म्याशी (वैश्विक ऊर्जेशी) एकरूप झाल्याचा अनुभव येतो. हीच अणुपेक्षा सूक्ष्म व आकाशापेक्षा व्यापक असणारी अनुभूती होय. तुकाराम महाराजांना ज्यावेळी हि अद्वैत अनुभूती प्राप्त झाली त्यावेळी त्यांनी आपल्या अभंग म्हणजे कधीही भंग न पावणाऱ्या वाणीमधून आपला अनुभव जगासमोर मांडला. तुकाराम महाराज म्हणतात,
अणु रेणू या थोकडा । तुका आकाशा एवढा ॥
आत्मा (आंतरिक उर्जा) ही अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. हि अणुपेक्षाही सूक्ष्म असणारी आंतरिक उर्जा ज्यावेळी गुरुकृपेने परमात्म्याशी (वैश्विक ऊर्जेशी) एकरूप होते त्यावेळी हि आंतरिक उर्जा अणुपेक्षाही सूक्ष्म व आकाशापेक्षा हि व्यापक असल्याची अनुभूती येते. वास्तविक आत्मा (आंतरिक उर्जा ) सिमित नसून सिमातीत आहे, मर्यादित नसून अमर्याद आहे. ती तेजःपुंज, स्वयंप्रकाशित, ज्ञानघन व आनंदरूप आहे. तुकाराम महाराजांनी अथक प्रयास व प्रचंड साधना (प्रयोग ) यांच्या माध्यमातून आपल्या सत्यस्वरूपाची, आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली. ओंकार स्वरूप असणारे सदगुरू आपल्या शिष्याला हि दिव्य अनुभूती प्राप्त करून देवू शकतात. कारण ते स्वतःच सूक्ष्मरूप धारक, महाविस्तारक व ब्रम्हांडव्यापक असतात. ते स्वतः तर तसे असतातच परंतु जे कोणी त्यांना शरण येतात त्यांनासुद्धा ते त्यांच्या सारखेच करतात.
प्रकाश संशोधनाच्या प्रक्रियेत विश्वाची निर्मिती हि शून्यामधून झाली नसून विश्वाच्या मुळाशी एक अखंड, अनंत उर्जा कार्य करत आहे हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. परंतु या उर्जेचे अंतिम स्वरूप काय आहे याबाबत विज्ञान अज्ञान आहे. उदा. विद्युत (Electricity) हिच्यामध्ये प्रचंड उर्जा आहे . परंतु हि उर्जा फक्त चितधारक आहे म्हणजे प्रकाशरूप आहे. परंतु ती चैतन्यकारक नाही. परमात्मा (वैश्विक उर्जा) हि चितधारक म्हणजे प्रकाशरूप तर आहेच परंतु ती त्याचबरोबर चैतन्यकारक सुद्धा आहे. प्रकाश हा जड आहे त्याच्यामध्ये जाणीव नाही. फक्त चैतन्य हे स्वयंगतिक आहे कारण त्याच्यामध्ये जाणीव आहे, ते ज्ञानघन आहे. हे विश्व जड नाही या विश्वाच्या मुळाशी उर्जा आहे ती उर्जा फक्त चितधारक म्हणजे प्रकाशरूप नसून चैतन्यकारक म्हणजे ज्ञानरूप सुद्धा आहे.
आधुनिक विज्ञान ज्या पायावर उभे आहे त्या आधुनिक विज्ञानाचा पायाच आज कॉनटम मेक्यानिक्सने उखडून टाकला आहे. हायजेनबर्गच्या अनिश्चिततावाद सिद्धांताने विज्ञानामधील निश्चितता पार धुळीला मिळवून टाकली आहे. इलेक्ट्रोनला मन आहे अशी भाषा काही शास्त्रज्ञ बोलू लागले व त्यातून ‘नॉन लोकल कनेक्शन’ ची कल्पना पुढे आली. एका ठिकाणच्या इलेक्ट्रोनवर दुसऱ्या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रोनचा परिणाम होऊ शकतो हि ती कल्पना. हि ‘नॉन लोकल कनेक्शन’ ची कल्पना खोडून टाकण्यासाठी ‘आईनस्टाइन, पोडोलोस्की व रोझोन’ या तीन शास्त्रज्ञांनी १९३५ साली एक प्रयोग सुचविला तो ‘ईपीआर प्रयोग’ म्हणून पुढे खूप गाजला.
१९८२ साली ‘अलन आस्पेक्ट’ या फ्रेंच शास्त्रज्ञाने ‘ईपीआर प्रयोग’ करून बघितला. एका इलेक्ट्रोनची फिरण्याची दिशा हि लाखो मैल दूर असलेल्या इलेक्ट्रोनच्या फिरण्याच्या दिशेने क्षणात बदलली आणि शास्त्रज्ञांची मती गुंग झाली. एकदा एकत्र असलेले इलेक्ट्रोन दोन वेगवेगळ्या दिशांना गेल्या नंतर लाखो मैल दूर अंतरावर असताना एका इलेक्ट्रोनची फिरण्याची दिशा बदलल्यानंतर चक्क दुसऱ्या इलेक्ट्रोनच्या फिरण्याच्या दिशेमध्ये बदल झाला होता. हे शक्यच नव्हतं कारण प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने त्यांनी एकमेकांशी संवाद साधला कसा? हे इलेक्ट्रोन एकमेकांशी संवाद साधतात तरी कसा? हे शक्यच नव्हतं.
परंतु तसं होताना दिसत होतं. इलेक्ट्रोनला मन आहे का? ते जिवंत नाहीत कशावरून? असे प्रश्न निर्माण झाले. जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाइन कॉनटम मेक्यानिक्स च्या समोरची लढाई हरला. ‘ईपीआर प्रयोग’ सिद्ध झाला. ‘नॉन लोकल कनेक्शनचं’ चैतन्यशक्तीचं अस्तित्व सिद्ध झालं. हे विश्व म्हणजे जडद्रव्याचा महासागर आहे असे म्हणणाऱ्या, ईश्वर मेला आहे (God is Dead ) असा निर्वाळा देणाऱ्या, आधुनिक विज्ञानाच्या पायाखालची जमीन सरकू लागली. मन, बुद्धी, आत्मा या खुळचट कल्पना आहेत. आध्यात्मिक अनुभूती म्हणजे ढोंग आहे, मेंदूवर झालेला विपरीत परिणाम आहे असे म्हणणाऱ्या विज्ञानवाद्यांची तोंडे आता मात्र पाहण्यासारखी झाली होती.
आधुनिक विज्ञान जेथे हात टेकते तेथून अध्यात्म सुरु होते. अध्यात्म हे शास्त्र आहे. महायोग हे विज्ञान आहे. हजारो ऋषीमुनींनी, साधू संतानी साधना करून (प्रयोग करून) ते सिद्ध केले आहे. वैश्विक उर्जा परमात्मा हा फक्त चित्तधारक म्हणजे प्रकाशरूप नसून तो चैतन्यधारक म्हणजे स्वयंगतिक व ज्ञानघन आहे हे अध्यात्माचे म्हणणे कॉनटम मेक्यानिक्स ने सिद्ध केले आहे. हे विश्व जड नाही, या विश्वामध्ये जड नावाची वस्तूच अस्तित्वात नाही. हे विश्व चैतन्याचा सागर आहे. अणुच्या गर्भापासून आकाशगंगेपर्यंत सर्वत्र चैतन्याचेच अस्तित्व आहे.
हे विश्व म्हणजे चैतन्याचा विलास आहे. हा विलास आहे चिद आणि चैतन्याचा, हा विलास आहे प्रकृती आणि पुरुषाचा, हा विलास आहे शिव आणि शक्तीचा, हा विलास आहे सृजन आणि संहाराचा, हा विलास आहे विकास व विनाशाचा, हा विलास आहे आत्मा व परमात्म्याचा, हा विलास आहे विज्ञान व अध्यात्माचा. समस्त विश्वब्रम्हांडामध्ये शुभ्र धवल रंगाने, पांडूरऽरंगाने विराजमान असणाऱ्या अविनाशी उर्जेचा, माझ्या पांडुरंगाचा हा विलास आहे. माझ्या ज्ञानराज माऊलीच्या ज्ञानेश्वरी मधून साकार झालेल्या शिवशक्तीचा हा विलास आहे, हा विश्व चैतन्याचा विलास आहे. या विश्वाच्या बाहेर परमात्मा नाही.
म्हणौनि जगापरोते । सारुनी पाहिजे माते । तैसा नव्हे उखिते । सकटची मी ॥ ज्ञानेश्वरी
या जगाच्या पलीकडे, या विश्वाच्या पलीकडे परमात्मा कुठे हि नाही. भगवे वस्त्र धारण करून, लंगोटी लावून, संसाराचा त्याग करून कुठे निघालास त्याला शोधायला? हे जग माया नाही, हे विश्व माया नाही, हे विश्व त्या चैतन्याचा विलास आहे. अरे वेड्या ! जग आणि जगदीश वेगळे नाही, जीव आणि शिव वेगळे नाही, आत्मा आणि परमात्मा वेगळे नाही, ज्ञान आणि विज्ञान वेगळे नाही, योग आणि भक्ति वेगळी नाही, चिद आणि चैतन्य वेगळे नाही, ॐ आणि सोऽहं वेगळे नाही. चितधारक म्हणजे प्रकाशरूप असणारा, चैतन्यकारक म्हणजे ज्ञानघन, षडगुणऐश्वर्य संपन्न असणारा चिद्विलासक ओंकार तूच आहेस.
‘तत्वमसी, तत्वमसी, तत्वमसी ओंकारा’
– प्रस्तुत लेख ओंकार महाराज लिखित ‘ओंकार गाथा’ मधील गुरु स्तवन या प्रकरणातून घेतला आहे.
Omkar Mission Omkar Meditation Center, Shani Mandir, Manpada Road, Dombivali East 421204 info@omkarmeditation.com
© 2015 All Rights Reserved. | Privacy Policy | Website Hosted & Managed by Supervision Host