Logo Omkar Mission Dombivali

अंतःप्रज्ञा

भारतीय ऋषी मुनींनी ज्ञानप्राप्ती साठी अंत:प्रज्ञेवर भर दिला व ते अंत:र्मूख झाले. या उलट पाश्चात्य वैज्ञानिकांनी बहि:र्मुख चिंतनाच्या द्वारे विश्वाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी त्यांनी तार्किक विश्लेषण (Logical Analysis) तार्किक अनुमान पद्धती, प्रमाण तसेच तुलनात्मक विवेचन या पद्धतीचा वापर केला.

पाश्चात्य विज्ञानाचा उगम ग्रीक परंपरेमध्ये आहे. विश्वाचे सुव्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर पाश्चात्य विचारवंत या निष्कर्षा पर्यंत पोहचले की विश्वाचे रहस्य उलगडण्या साठी पुराण कथा व अंधविश्वास यांचा काही एक उपयोग होणार नाही. म्हणून विश्वाचे रहस्य उलगडण्या साठी त्यांनी तर्कप्रणालीवर जोर दिला. जे आपल्या बुद्धीला पटत नाही, प्रयोग शाळेत जे सिद्ध करता येत नाही, त्या गोष्टींची त्यांनी उपेक्षा केली. विज्ञान क्षेत्रातून व्यक्तीनिष्ठता पूर्णपणे घालविण्यासाठी त्यांनी प्रायोगिक तसेच प्रत्यक्ष अनुभवसिद्ध पद्धतीचा अधिकाधिक उपयोग केला.

त्यांच्या अफाट प्रयत्नांतूनच अनेक अज्ञात असणारे नियम माणसाला ज्ञात झाले. पाश्चात्य वैज्ञानिकांना तर्कनिष्ठता आणि वस्तुनिष्ठता यांच्या बाह्य कार्यप्रणालीवर ज्या प्रचंड वेगाने सफलता भेटली त्याच वेगाने अंत:प्रज्ञेवर विश्वास ठेवण्याची त्यांची प्रवृत्ती नष्ट झाली. याचा परिणाम असा झाला की  भौतिक शास्त्रच नाही तर मानसशास्त्र, समाजशास्त्र या विषयांवर सुद्धा वस्तुनिष्टतेचा अतिरेक प्रभाव पडला. समाज शास्त्रज्ञांना सुद्धा शास्त्रज्ञ म्हटले जावू लागले व त्यांनी संशोधनाची जी पद्धती विकसित केली तिला ‘शास्त्रीय पद्धती’ म्हटली जावू लागली. जर वस्तुनिष्टतेच्या आधारावर कोणी संशोधन केले नाही तर ती पद्धत अयोग्य ठरवून तिची अवहेलना केली जाऊ लागली

परंतु स्वतःला विचारवंत म्हणवून घेणारे हे लोक ह्या गोष्टीचा विचार करत नाहीत की भौतिक शास्त्रांमध्ये ज्या भौतिक वस्तूचा विचार केला जातो ती वस्तू म्हणजे पदार्थ आहे. पदार्थाच्या संशोधनासाठी वस्तुनिष्टतेचा प्रयोग करणे उचितच आहे परंतु मानसशास्त्रा सारख्या विषयांमध्ये वस्तू नाही. भावना, इच्छा, आकांक्षा, राग, द्वेष, परहित प्रवृत्ती, आक्रमक प्रवृत्ती यांसारख्या मनोव्यापारांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्रज्ञांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्या वस्तू पदार्थ नाहीत, त्या दृश्य नाहीत.

भावना, इच्छा, वृत्ती, प्रवृत्ती तसेच मन, बुद्धी, आत्मा हे प्रयोग शाळेत सिद्ध करता येत नाही त्यामुळे त्यांना अस्तित्वच नाही. अशा प्रकारचा अट्टाहास ज्यावेळी स्वतःला विचारवंत म्हणवून घेणारी माणसं करून घेतात त्या वेळेला त्यांच्या शहाणपणाची कीव येते. कोणाला मान्य असो अथवा नसो, ज्ञान प्राप्तीच्या संदर्भात अंतःप्रज्ञेचा उपयोग निश्चितच होतो असा निर्वाळा वैज्ञानिक क्षेत्रामधील महर्षी असणाऱ्या अनेक वैज्ञानिकांनीच दिला आहे. केक्युले, न्युटन, आइनस्टाईन इत्यादींचा या संदर्भात अनुभव उल्लेखनीय आहे.

रसायन शास्त्रामधील ‘केक्युले’ या शास्त्रज्ञाचा अंतःप्रज्ञेच्या संदर्भातील अनुभव आश्चर्यचकित करणारा आहे. एके दिवशी केक्युले हा शास्त्रज्ञ रात्री शेवटच्या बसने घरी येत होता. केक्युले बसमध्ये अर्धनिद्रा अवस्थेमध्ये होता. अचानक त्याला दृश्य जाणवलं की रासायनिक अणु नृत्य करत आहेत. या अगोदर सुद्धा त्याला अणूंची गतिमान अवस्था जाणवली होती. परंतु अणुमधील गतीचे स्वरूप स्पष्ट होत नव्हते. यावेळेला मात्र त्याला रासायनिक अणूंची गती स्पष्ट जाणवली. त्यानंतर त्याने कागदावर ह्या दृश्याचे रेखाचित्र तयार करून आपल्या सिद्धांताची मांडणी केली.

आईनस्टाईनचा सापेक्षतावाद सिद्धांत हा विज्ञानामधील एक अतिशय महत्वाचा असा सिद्धांत आहे परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे एव्हढ्या महत्वाच्या सिद्धांताचा शोध आईनस्टाईनने आपल्या अंतःप्रज्ञेच्या जोरावर लावला. आईनस्टाइनचे काही सिद्धांत एवढे विचित्र होते की शास्त्रज्ञांचा त्याच्यावर विश्वासच बसेना. उदाः आईनस्टाइनच्या मते प्रकाशाच्या वेगाबरोबर त्याची तीव्रता वाढते. पदार्थामध्ये त्याच्या गतीनुसार आकुंचनाची क्रिया होते. अवकाश वक्रीभूत आहे. आईनस्टाइनचे हे सिद्धांत तर्कवादी शास्त्रज्ञांना कवी कल्पना वाटत होते.

शास्त्रज्ञांनी प्रायोगिक तत्वप्रणाली नुसार आईनस्टाइनच्या अनेक निष्कर्षाची प्रत्यक्ष अनुभव घ्यायला सुरुवात केली तेव्हा ते सिद्धांत खरे आहेत हे सिद्ध झाले. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आईनस्टाईन आपल्या संशोधनासाठी प्रयोगशाळेत गेला नाही अथवा त्याने कुठल्याही पद्धतीचे प्रयोग केले नाहीत. आईनस्टाइनने फक्त अंतर्मुखी चिंतनाच्या जोरावर अंतःप्रज्ञे द्वारे शोध लावले. अंतःप्रज्ञेवर त्याचा अतूट विश्वास होता. अंतप्रज्ञा व तर्कप्रज्ञा ह्या परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत. उच्च प्रतीच्या वैज्ञानिकांनी वैज्ञानिक संशोधनात अंतःप्रज्ञेचा उपयोग केला व जाणून बुजून तिचा उल्लेखही केला परंतु अजूनही काही हटवादी वैज्ञानिक अंतःप्रज्ञेला विश्वरहस्य उलगडण्याच्या बाबतीत मान्यता देत नाही कारण वैज्ञानिक क्षेत्रात अंतःप्रज्ञेच अस्तित्व मान्य केलं तर विज्ञानामधून अध्यात्माची द्वारे सताड उघडी होतील.

हटवादी वैज्ञानिक हे मान्य करोत अथवा न करोत आईनस्टाइनचा सापेक्षतावाद सिद्धांत (Relativity principle) हायजेनबर्ग शास्त्रज्ञाचा अनिश्चीततावाद सिद्धांत (Uncertainty principle) ‘मॅक्स प्लॅक्स’चा  क्वाँटम सिद्धांत (Quantum Theory) या सर्व सिद्धांतांनी न्युटनच्या विश्वविषयक संकल्पना मध्ये पूर्णपणे बदल करून टाकला आहे.  न्युटनच्या सिद्धांतावर उभा असलेला आधुनिक विज्ञानाचा पाया या शास्त्रज्ञांनी डळमळीत करून टाकला आहे. आजच्या आधुनिक शास्त्रज्ञांचे विचार व भारतीय ऋषी मुनींनी ऋतुंभरा प्रज्ञेद्वारे मांडलेले विचार या सर्वांमध्ये इतके साम्य आहे की यातला कुठला विचार ऋषी मुनींनी मांडला आहे व कुठला विचार शास्त्रज्ञांनी मांडला आहे हे कळायला सुद्धा जागा नाही.

आजच्या आधुनिक युगामधील सर्वात आश्चर्यकारक घटना जर कोणती असेल तर ती ही आहे की निरीक्षणे, प्रयोग, पदार्थांचे पृथक्करण, अणूंचे संशोधन, अथक प्रयास, अविश्रांत श्रम, अब्जावधींचा चुराडा करून विज्ञानाच्या प्रायोगिक तत्व प्रणालीला अनुसरून आजचे वैज्ञानिक ज्या निष्कर्षा पर्यंत पोहचले आहेत त्यांचे ते निष्कर्ष व कुठल्याही प्रकारच्या प्रयोग शाळेत न जाता कुठलेही प्रयोग न करता केवळ अंतःर्मुखी चिंतन, ध्यान, समाधी, साक्षात्कार यांच्या योगे प्राचीन ऋषीमुनींनी मांडलेले निष्कर्ष यांच्या मध्ये कल्पनातीत समानता आहे.

नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ श्रोडींगर याने क्वाँटम सिद्धांतातील मुलभूत समीकरणांना संख्याबद्ध केले, सूत्रबद्ध केले. क्वाँटम सिद्धांताच्या प्रणेत्या मधील श्रोडींगर हा पहिला शास्त्रज्ञ आहे की, ज्याने वैदिक उपनिषदांचे विचार व आधुनिक विचारवंताचे विचार यांच्यामधील समानता जाणली. त्याने आपल्या दोन पुस्तकांमधील ‘MY VIEW OF THE WORLD’ आणि ‘MIND AND MATTER’ ह्या पुस्तकांतर्गत आपल्या विचारांचे प्रतिपादन केले आहे.

काही वर्षापूर्वी स्वीस शास्त्रज्ञ Fritjof Capra  याने आधुनिक विज्ञानातील संशोधन आणि पौर्वात्य देशामधील प्राचीन ज्ञानाची समानता यांच्यावर स्वतंत्र ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्याचं नावं आहे- The Tao Of Physics. काप्राच्या मते विसाव्या शतकाचे आधार स्तंभ असणारे क्वाँटम सिद्धांत (Quantum Theory) आणि सापेक्षतावाद सिद्धांत (Relativity Theory) यांच्या मुळे विश्वाकडे पाहण्याची एक नवीनच दृष्टी प्राप्त झाली आहे.

विश्व व विश्वाचा व्यवहार हा सत्य नसून मनोजन्य आहे. सत्य मानवाच्या दृष्टीच्या कक्षेत येत नाही. विश्वामधील विविध पदार्थ, विविध वस्तू, जड, चेतन, पशु, पक्षी, मानव, प्राणी, ग्रह, नक्षत्रे, तारे ह्या अखिल चराचर विश्वामधील भिन्न पदार्थ हे वास्तविक एकाच मूळ तत्वाचे अविष्कार आहेत. भारतीय विचारवंत त्याला ‘ब्रम्ह’ या नावाने संबोधतात. अखिल चराचर सृष्टीमध्ये हे ब्रम्ह म्हणजेच चैतन्य कोंदून कोंदून भरले आहे. ते आपल्या इंद्रियांच्या कक्षेत येत नाही. इंद्रियाच्या कक्षेत येणाऱ्या विश्वालाच सत्य समजणे हे अज्ञान होय.

ब्रह्मच सत्य आहे हे जाणणे व अनुभवणे हेच खरे ज्ञान आहे. विश्व हे जैविक (Organic), गतिशील (Dynamic), परस्पर सबंधित (Dependent), चिरंतन (Eternal) असे आहे. जळी, स्थळी, काष्ठी परमात्मा आहे. जीव, जगत व जगदीश यांच्यामध्ये अलौकिक सबंध आहे. सृष्टा व सृष्टी एकच आहे. आत्मा व परमात्मा एकच आहे हा अद्वैतवाद हाच भारतीय विचार प्रणालीचा गाभा आहे. गति आणि परिवर्तन विश्वाचा अविभाज्य भाग आहे. गति उत्पन्न करणारी शक्ती विश्वाच्या बाहेर आहे या ग्रीक परंपरागत विज्ञानाच्या कल्पनेवर त्यांचा विश्वास नाही. विश्वाचे केंद्र बाहेर नसून आपल्या आतच आहे. माणूस अंतर्मुख झाला की ध्यानाच्या माध्यमातून अंतर्ज्ञान व अंतःप्रज्ञेद्वारा मनुष्याला या सत्याचा साक्षात्कार होतो.

ज्ञाता हा ज्ञेयाशी एकरूप आहे. Observer and Object are the same. अखिल विश्व ब्रम्हांड ज्या अंतिम सत्याचा शोध घेत आहे तो माझ्या आतच आहे. तो व मी भिन्न नसून ‘आत्मा हाच परमात्मा आहे’ हेच भारतीय तत्त्वज्ञानाचे सार आहे. हेच आमचं महायोग विज्ञान आहे. हे महायोग विज्ञान जर तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर योग्य सदगुरूच्या मार्गदर्शना खाली साधना (प्रयोग) करा. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या.

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शक्ती, ज्ञान व आत्मविश्वास यांची  आवश्यकता असते. शक्ती, ज्ञान व आत्मविश्वास हे बाजारातून विकत घेता येत नाही. त्यासाठी कष्ट व मेहनत करावी लागते. अध्यात्म हे ढोंगी व आळशी लोकांसाठी नाही. येथे हिम्मतवान व साहसी लोक पाहिजेत. तुमच्यामध्ये ते साहस असेल, तुमच्यामध्ये जर ती हिंमत असेल तर महायोग विज्ञानाची प्रयोग शाळा असणाऱ्या ओंकार मिशनच्या ‘ओंकार मेडिटेशन सेंटर’ मध्ये आपलं स्वागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *