Logo Omkar Mission Dombivali

मूळाधार चक्र

या समस्त सृष्टीचा जो मुळ आधार आहे तो मूल आधार म्हणजे मूळाधार चक्र होय. मूळाधार चक्राची देवता शनि आहे. या मूळाधार चक्रामध्ये आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, सुप्त अवस्थेमध्ये असतात. प्रत्येकाला मोठे होण्याची इच्छा असते. प्रत्येकाला कर्तृत्वाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होण्याची आकांक्षा असते. परंतु फक्त इच्छा व आकांक्षा असून कोणीही मोठा होत नाही. त्यासाठी शक्तीचीसुद्धा आवश्यकता असते. इच्छेला जर शक्तीची जोड भेटली तर या जगामध्ये अशक्य असे काही नाही. मनुष्याच्या समस्त इच्छा व आकांक्षा या मुळाधारामध्ये आहेत.

जप, तप, योग इत्यादींच्या माध्यमातून आपण आपल्यामध्ये असणारी कुंडलिनी शक्ती जागृत करू शकतो. परंतु त्यासाठी किती काळ जाईल हे सांगता येत नाही. मग सर्वसामान्यांसाठी काही मार्ग नाही का? आहे, हा मार्ग आहे भक्तीचा, सेवेचा, समर्पणाचा. पुरुषार्थाचा अवलंब करून माणुस जेथे पोहोचतो, सेवा व समर्पणाने सुद्धा माणुस तेथेच पोहोचतो. फक्त तुमची श्रद्धा पाहिजे.

जो श्रद्धावान असतो त्यालाच ज्ञानाचा व शक्तीचा लाभ होतो. तोच यशस्वी होतो. ज्यांच्यामध्ये पुरुषार्थ आहे अशा लोकांनी भौतिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कष्ट, मेहनत करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. परंतु जे दिन दुबळे आहेत ते जर मोठयांच्या आश्रयाखाली राहिले त्यांनी सेवा, समर्पण व प्रामाणिकपणा यांच्या जोरावर मोठयांची मने जिंकून घेतली तर मोठी माणसे त्यांचा योगक्षेम वाहतात. जो मोठ्यांना शरण जातो, त्यांची सेवा करतो, त्यांच्या प्रति समर्पित होतो अशांना मोठी माणसं, यशस्वी माणसं, कर्तृत्वान माणसं, ऐश्वर्यवान व्यक्ती त्यांना जीवनांमध्ये काही ही कमी पडू देत नाहीत. कारण मोठ्यांना सुद्धा आपला कारभार सांभाळण्यासाठी दैवी गुण असणार्‍या व्यक्तीची गरज असते.

परमार्थामध्ये सुद्धा असेच आहे. ज्यांच्यामध्ये पुरुषार्थ आहे ते लोक जप तप व योगाच्या माध्यामातून आपला भौतिक व अध्यात्मिक विकास साधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु जे दीन, दुबळे, पतीत आहेत त्यांचा मार्ग आहे भक्तीचा, सेवेचा, समर्पणाचा. शनिदेव सर्वशक्तिमान आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, जागृत आहे. कलीयुगामध्ये बर्‍याच देवता ह्या निद्रीत स्वरुपात पहुडलेल्या आहेत. त्यांना जर जागृत करायचं असेल तर बारा बारा वर्ष तपश्चर्या करावी लागते. लाखो कोटी मंत्रांचा जप करावा लागतो, तेव्हा कुठे मंत्र सामर्थ्याने ह्या देवता जागृत होतात व आपल्या भक्तांना त्यांच्या तपश्चर्येचे फळ देतात. परंतु शनिदेव हे मुळातच जागृत आहेत. कलीयुगामध्ये अखंड जागृत असणारा एकमेव देव म्हणजे शनिदेव.

जागृत आहे म्हणून प्रत्येक राशीमध्ये भ्रमण करत आहे. जागृत नसता तर भ्रमण केले असते का? म्हणून शनिदेवाला तपश्चर्या करून अथवा मंत्रशक्तीच्या माध्यमातून जागृत करण्याची आवश्यकता नाही. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आवश्यकता आहे सेवेची, समर्पणाची आणि प्रेमाची. शनिदेवाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येते की शनिदेवाला लहानपणीच सर्वांनी झिडकारले होते. त्यामुळे शनिदेव हे आत्मकेंद्रित असतात. भगवान शंकराकडून प्राप्त झालेल्या अनाहत नादामध्ये अखंड रमलेले असतात. भगवान शंकराने दिलेल्या दिव्य बोधावर सोsहं बोधावर स्थिर असतात.परंतु कुठेतरी मनाच्या कोपर्‍यामध्ये आपुलकी, प्रेम, यासाठी आसुसलेले असतात.

ईश्वर हा प्रेमाचा भुकेला आहे. त्याला आणखी काही नको. एखादा महाज्ञानी, महायोगी जो सोsहं भावामध्ये आकंठ बुडालेला आहे परंतु भक्तीच्या सुखासाठी तो ज्यावेळी शनिदेवाच्या भक्तीला लागतो, त्यांची नित्य उपासना, सेवा करतो त्यावेळी ते समस्त ऐश्वर्याने त्याच्यासमोर प्रकट होतात. असा जो महायोगी असतो तो आपल्या भक्तीच्या व योगाच्या अलौकिक सामर्थ्याने जसा पुंडलीकाने प्रत्यक्ष परमात्म्याला विटेवर उभा केला आहे तसा तो परमात्म्याला आपल्या अलौकिक अध्यात्मिक शक्तीच्या जोरावर उभा करतो.

इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. असाच नवीन इतिहास शनैश्वर संस्थान, डोंबिवली येथे घडला आहे. एका महायोग्याने आपल्या अध्यात्मिक सामर्थ्याच्या जोरावर जसा पुंडलीकाने पांडुरंगाला विटेवर उभा केला आहे तसाच शनैश्वर संस्थान, डोंबिवली येथे शनी देव उभा आहे. येथील शनिदेवाची शिळा ही शिळा नसून ते शक्तीकुंड आहे. ह्या शक्तीकुंडामधून उर्जा अहोरात्र प्रवाहित होत असते. तुम्ही या शक्तीपीठामध्ये असलेल्या शक्तीकुंडाची, भगवान शनीच्या शिळेची नित्य उपासना, पूजा, सेवा केली तर शक्तीकुंडामधून शिळेमधून प्रवाहित होणार्‍या शक्तीने, उर्जेने तुमचे मूळाधार चक्र जागृत होऊन थोड्याच काळामध्ये तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास सुरुवात होते. जसजशी तुमची साधना वाढेल तसतशी तुमची भौतिक व अध्यात्मिक अशी दोन्ही प्रगती लोकांच्या नजरेत येण्यास सुरुवात होते. म्हणून कुठलाही योग न करता फक्त सेवा व समर्पण या माध्यमातून तुम्ही शनिच्या शीळेची, शक्तीकुंडाची उपासना करून योग साधु शकता.

मुलाधाराची देवता शनि आहे व मुलाधारामध्येच आपल्या इच्छा आकांक्षा सुप्त स्वरुपात आहेत. शनिदेवाच्या स्वयंभु जागृत शिळेच्या शक्तीकुंडाच्या उपासनेने आपल्या इच्छा व आकांक्षाना गती भेटते व संसारामध्ये राहुन माणुस भौतिक व अध्यात्मिक असा दोन्ही विकास साधु शकतो. परमार्थ करणार्‍या बर्‍याच लोकांना हे रहस्य माहित नाही. त्यामुळे हे पारमार्थिक लोक कनिष्ठ देवता म्हणुन शनिदेवाला हिणवतात, तुच्छ समजतात. शनीची उपासना म्हणजे सामान्य ग्रहाची उपासना समजतात. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगायला लागतात.

वास्तविक शनीची उपासना ही सामान्य ग्रहाची उपासना नसून ती मूलाधार चक्राची उपासना आहे. अध्यात्मा मध्ये या मूलाधार चक्राला फार महत्व आहे. मूलाधार चक्राच्या जागृतीनेच मनुष्याच्या अध्यात्मिक जीवनाला सुरुवात होत असते व मूलाधार चक्राच्या जागृतीनेच मनुष्याच्या भौतिक विकासाला सुरुवात होत असते कारण मनुष्याच्या सुप्त असणाऱ्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्याची शक्ती फक्त मूलाधार चक्रामध्येच आहे. ज्यांचा ज्यांचा भौतिक व अध्यात्मिक विकास झाला आहे त्यांचा तो विकास मूलाधार चक्राच्या जागृतीनेच झाला आहे. हे रहस्य आपणास माहित असो वा नसो, पण सत्य हेच आहे. जाणता अथवा अजाणता भौतिक वा अध्यात्मिक जीवनामध्ये यशस्वी असणाऱ्या व्यक्तींनी मूलाधार चक्राचीच उपासना केलेली असते.

हे मूलाधार चक्र श्रद्धा, सेवा, समर्पण या माध्यमातूनच विकसित होत असते. तुम्ही कोणावर श्रद्धा ठेवली आहे याला महत्व नाही, तुमची श्रद्धा किती दृढ आहे याला जास्त महत्व आहे. तुम्ही कोणाची सेवा केली याला महत्व नाही, तुम्ही किती निस्वार्थ भावनेने सेवा केली आहे याला महत्व आहे. तुमचे समर्पण कोणाशी निगडीत आहे याला महत्व नाही, तुमचे समर्पण संपूर्ण भावाने आहे की नाही याला महत्व आहे. भौतिक व अध्यात्मिक जीवनामध्ये यशस्वी झालेल्या मनुष्याची कोणावर ना कोणावर श्रद्धा असते मग ती श्रद्धा व्यक्तीनिष्ठ असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीशी निगडीत असेल अथवा आत्मनिष्ठ म्हणजे स्वतःशीच निगडीत असेल. ज्या माणसाचा स्वतःवर विश्वास नाही तो मनुष्य या जगामध्ये काहीच करू शकत नाही. म्हणून व्यक्तीनिष्ठ श्रद्धे बरोबर आत्मनिष्ठ श्रद्धा सुद्धा तेव्हढीच महत्वाची आहे.

पुरुषार्थाला परमार्थाची जोड पाहिजे व परमार्थाला पुरुषार्थाची जोड पाहिजे. तरच भौतिक व अध्यात्मिक अशी दोन्ही प्रगती साधून माणूस जिवंतपणीच आपले घर स्वर्ग बनवू शकतो. हेच आमचे शनी विज्ञान आहे. हे शनिविज्ञान आत्मसात करा, त्याचे प्रयोग करा. फक्त देव-देव करत बसू नका. कष्ट करा, मेहनत करा, पुरुषार्थ करा. शनिदेवाची तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आपल्या पुरुषार्थाने सर्व काही मिळविले आहे, त्यांनी मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो या समाजाचे काही देणे लागतो ह्या भावनेने दीन, दुबळे, पतित यांची सेवा करावी. म्हणजे शनिदेवाची त्यांच्यावर अवकृपा होणार नाही. थोडक्यात शनिदेवाची अवकृपा टाळून शनिदेवाची कृपा संपादन करण्याचे जे ज्ञान आहे तेच हे शनिविज्ञान.

 – प्रस्तुत लेख ओंकार महाराज लिखित ‘शनी विज्ञान’ या पुस्तका मधून घेतला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *